
नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील ४० पेक्षा जास्त आमदारांना सोबत घेऊन बंडखोरीचे बिगुल वाजवले आहे. यामध्ये मातोश्रीच्या अगदी जवळ असलेले आमदारही शिंदे यांच्या गोटात सहभागी झाले असल्याने शिवसेनेमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, शिंदे आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्यात फारसे सख्य नसल्याचे वेळोवेळी उघड झाले होते. तेच सरनाईक महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असतानाही नाराज असल्याची चर्चा होत होती. सरनाईक यांनी गेल्या वर्षी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून भाजपबरोबर जुळवून घेण्याची विनंती केल्याने मोठी खळबळ उडाली होती; मात्र आता तेच सरनाईक शिंदे यांच्यासोबत बंडखोरीमध्ये सहभागी झाले असल्याने ठाण्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आले आहे.
प्रताप सरनाईक हे मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शिलेदार जितेंद्र आव्हाड यांचे ते कट्टर समर्थक होते; मात्र सत्तास्पर्धेत त्यांनी आव्हाडांना शह देण्यासाठी राष्ट्रवादीतच आपला वेगळा गट बनवून अजितदादा पवारांशी जवळीक करण्याचा प्रयत्न सुरू केला. काही वर्षे आव्हाड सरनाईक यांच्यातला पक्षांतर्गत कलगीतुरा सुरू होता; मात्र राष्ट्रवादीत राहून आपल्याला भवितव्य नसल्याचे लक्षात येताच सरनाईक यांनी शिवसेनेत प्रवेश करून ओवळा माजिवड्याची आमदारकी मिळवली.
सरनाईक यांची राजकीय इच्छाशक्ती मोठी असल्याने त्यांना शिवसेनेतूनही विरोधाचा सामना करावा लागला. शिवसेनेतून त्यांना मिळालेले मीरा-भाईंदरचे संपर्कप्रमुखपद शेवटच्या क्षणी कापण्यात आले, त्यामागेही एकनाथ शिंदे असल्याचे सांगण्यात येत होते. विशेष म्हणजे, शिंदे यांचे जिल्ह्यावर एकहाती वर्चस्व असताना सरनाईक यांच्या हाती आमदारकी व्यतिरिक्त फारसे काही लागलेले नाही.
सलग तीन वेळा आमदार होऊनही शिवसेनेत सरनाईक यांच्या वाट्याला महत्त्वाची पदे आली नाहीत. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार अशी चर्चा सुरू झाली होती. तीन पक्षाच्या सरकारमध्ये सरनाईक यांना मात्र स्थान मिळू शकले नाही. विशेष म्हणजे, एकनाथ शिंदे आणि सरनाईक यांच्यातील मतभेद उघडपणे कधीच झाले नाहीत; मात्र सरनाईक शिवसेनेत नाराज असल्याचेही कधी लपून राहिलेले नाही. असे असताना एकनाथ शिंदे यांच्या सोबत बंडखोरीमध्ये सहभागी होउन गुवाहाटीला गेले असल्याने तर्क-वितर्कांना ऊत आलेला आहे.