निवडणुकांच्या संकेतांमुळे पक्ष कार्यालयात गर्दी

निवडणुकीच्या तोंडावर वॉर्डातील, प्रभागातील अडगळीत पडलेल्या पक्ष कार्यकर्त्यांना सध्या सुगीचे दिवस आले आहेत.
निवडणुकांच्या संकेतांमुळे पक्ष कार्यालयात गर्दी

ठाणे : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे संकेत मिळताच सर्वच राजकीय पक्षात उत्साहाचे वातावरण पहायला मिळत असून स्थानिक पातळीवर प्रमुख नेत्यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागा असा संदेश देताच सर्वत्र सभा, मेळावे आरोग्य शिबिरे, हळदीकुंकू, खेळ पैठणीचा आदी कार्यक्रमांना जोर आला असून ओस पडलेली पक्षांची कार्यालये पुन्हा कार्यकर्त्यांच्या गर्दीने गजबजू लागली आहेत.

निवडणुकीच्या तोंडावर वॉर्डातील, प्रभागातील अडगळीत पडलेल्या पक्ष कार्यकर्त्यांना सध्या सुगीचे दिवस आले आहेत. प्रभागातील विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना पुढारी हजेरी लावत आहेत, तर कार्यकर्त्यांच्या माध्यमांतून बॅनरबाजी करून मतदारांच्या नजरेत राहण्याचा प्रयत्न नेते व पक्षांचे पदाधिकारी करताना दिसत आहे. नेते व विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस करीत आहेत. नेते, पदाधिकारी, इच्छुक उमेदवारही वॉर्ड, प्रभाग पिंजून काढताना दिसत आहेत. आता आगामी निवडणुकांमुळे अडगळीतल्या कार्यकर्त्यांना सुगीचे दिवस येणार आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद, नगरपंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी इच्छुक लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी कामाला येणार आहेत. आता सुख-दुःखाच्या प्रसंगात नेतेमंडळी आवर्जून हजेरी लावत आहेत. इच्छुक उमेदवार प्रकाशझोतात राहण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या शोधत आहेत.

सर्वच पक्षांकडून 'कार्यकर्ता जोडो’ अभियान

लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता असून, ठाणे, कल्याण, कोपरी-पाचपाखाडी, ओवळा-माजिवडा आणि कळवा-मुंब्रा मतदारसंघात इच्छुक उमेदवार आणि नेतेमंडळी कार्यकर्त्यांची फळी मजबूत करण्यासाठी कामाला लागले आहेत. त्यातूनच सर्वच पक्षांकडून ’कार्यकर्ता जोडो’ अभियान घेण्यास सुरुवात झाले आहे. प्रत्येक प्रभागात, वॉर्डात कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या सत्यनारायण पूजा, हळदीकुंकू, क्रीडा स्पर्धा, आरोग्य शिबिरे आणि धार्मिक उत्सवांना नेतेमंडळी हजेरी लावून आपल्या उपस्थिती प्रभागात किती छाप पाडू शकते, याची चाचपणी सुरू झाली आहे.

लोकसभेची निवडणूक लिटमस टेस्ट

लोकसभा निवडणुकीत विधानसभा निवडणुकीची पायाभरणी होणार आहे. यामुळे ठाणे लोकसभा क्षेत्रातील सहा विधानसभा मतदारसंघात सर्वच पक्षांची लिटमस टेस्ट असणार आहे. महायुतीतील शिंदे गट, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील नेते, पदाधिकारी एकत्रित विविध कार्यक्रमांना हजेरी लावून वातावरणनिर्मितीसाठी प्रयत्न करीत आहेत. यामुळे शहरातील राजकारण चांगलेच तापत आहे.

logo
marathi.freepressjournal.in