ठाण्यातील खड्डेपुराण सुरुच; उड्डाणपुलांवर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या

सात वर्षांपासून सिमेंट कांक्रीटचे रस्ते तयार करण्यावर महापालिकेने ४६४ कोटी ६२ लाख रुपये खर्च केले आहेत
ठाण्यातील खड्डेपुराण सुरुच; उड्डाणपुलांवर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या

यंदा पालिकेची निवडणूक असल्याने पालिकेच्या बजेटमध्ये रस्ते काँक्रिटीकरणासाठी ३० कोटी, रस्ते नूतनीकरण ३० कोटी, विकास आराखड्यातील रस्ते बांधणे ३० कोटी, यूटीडब्लूटी पद्दतीने रस्ते नूतनीकरण यासाठी ३० कोटी खर्च करण्यात येणार आहेत, तर रस्त्यांच्या पुनपृष्टीकरणाकरता २५० कोटी तर खड्डे दुरुस्तीसाठी १० कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत. असे असताना दोन महिन्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास विभागाकडून एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पाकरिता २१४ कोटींचा भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. अशा प्रकारे यंदा शहरात रस्त्यांची ६६२ कोटी रुपयांची कामे करण्यात येणार आहेत. त्यापैकी बरीच कामे सुरु झाली आहेत. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात प्रमुख रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. तरी शहरातील रस्त्यांवरचे खड्डेपुराण थांबायला तयार नाही. प्रमुख रस्ते आणि उड्डाणपुलांवर मोठं मोठे खड्डे पडले असून शहरात येणाऱ्या आणि जाणाऱ्या रस्त्यांवर वाहनांच्या मोठं मोठ्या रांगा लागल्या आहेत.

गेल्या सात वर्षांपासून सिमेंट कांक्रीटचे रस्ते तयार करण्यावर महापालिकेने ४६४ कोटी ६२ लाख रुपये खर्च केले आहेत. तर खड्डे बुजवण्यासाठी ३० कोटीहून अधिक खर्च झाला आहे. शहरात जे खड्डे वेळोवेळी पडतात त्यावर कायमचा उपाय शोधण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून बरेच प्रयत्न सुरु आहेत, परदेशी तंत्राचा वापर करण्यात आला आहे. दरवर्षी ज्या ठिकाणी खड्डे पडतात त्यांचा सर्व्हे करून त्या ठिकाणी कायमस्वरूपी उपाय शोधण्याचा प्रयत्न झाला, २०१५ पासून शहरातील रस्ते काँक्रीटीकरण करण्याचा नवा उपाय शोधण्यात आला त्यातून रस्ते काँक्रीट करण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरु आहे.

प्रत्येकवर्षी पावसाळा सुरु होताच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडतात यातून मार्ग काढण्यासाठी सिमेंट काँक्रीटचे रोड तयार करण्याचे धोरण स्वीकारण्यात आले. विशेष म्हणजे अशा रस्त्यावर सहसा खड्डे पडत नाहीत मात्र अशा पक्क्या रस्त्यांवरही खड्डे पडले असल्याचे शहरात चित्र आहे.

दुसरीकडे जवळपास ३० लाखांची लोकसंख्या असलेल्या ठाणे शहरात महानगर पालिकेने रास्ता रुंदीकरण मोहीम हाती घेऊन रस्ते मोठे करण्याचे प्रयत्न केले. मात्र प्रत्यक्षात रस्ते रुंद जरी झाले असले तरीही रस्त्यांवरील दुतर्फा पार्किंगमुळे शहरातील वाहतूक कोंडी काही कमी होताना दिसत नाही. मुंबईकडून ठाण्यात प्रवेश करताच आनंद नगर टोल नाका पार करतांना प्रवाशांचा वेळ वाया जातो, त्यात भर म्हणून की काय एमएमआरडीएच्या ढिसाळ नियोजनामुळे गेल्या दशकापासून कोपरी पुलाचे काम अत्यंत संथ गतीने सुरु आहे. त्यामुळे कोपरीच्या पुढील सर्वच चौक वाहतूक कोंडीत बुडालेले असतात.

ठाण्यात कॅडबरी जंक्शन, विव्हियाना मॉल, सिनेवंडर आणि तीन हातनाका ही कायमस्वरूपी वाहतूक कोंडीची ठिकाणे आहेत. ठाण्यात रस्ते अरुंद आणि वाहनांची संख्या अधिक आहे. त्यामुळे बहुतांशी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडत असल्याने परिस्थिती खूपच भयावह झाली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in