उल्हासनगरमधील धक्कादायक घटना : शासकीय रुग्णालयाच्या टेरेसवरून पळून जाण्याचा प्रयत्न करताना रुग्णाचा मृत्यू?

पीडब्ल्यूडीने जाळी बसवून दिली नाही, म्हणून हा रुग्ण टेरेसवर पोहोचला आणि तिथे त्याला हृदयविकाराच्या झटका आला असावा, आणि म्हणून त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. मनोहर बनसोडे यांनी व्यक्त केला
उल्हासनगरमधील धक्कादायक घटना : शासकीय रुग्णालयाच्या टेरेसवरून पळून जाण्याचा प्रयत्न करताना रुग्णाचा मृत्यू?
Published on

उल्हासनगर : मध्यवर्ती रुग्णालयाच्या टेरेसवर एका रुग्णाने प्राण गमावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी रात्री हा रुग्ण गंभीर आजारावर उपचार घेण्यासाठी मध्यवर्ती रुग्णालयात वार्ड नंबर १२मध्ये भरती करण्यात आला होता, मात्र वॉर्डबॉय व नर्स यांची नजर चुकवून तो टेरेसवर गेला, दरम्यान टेरसेवरून पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर मध्यवर्ती रुग्णालयात एकच खळबळ उडाली आहे.

सूर्यकिरण बिरला (वय वर्ष अंदाजे ४०) असे या रुग्णाचे नाव असून, तो उपचार घेण्यासाठी कर्जत ग्रामीण येथून उल्हानगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल झाला होता. मात्र उपचारादरम्यान तो पहाटेच्या सुमारास रुग्णालयाच्या टेरेसववरून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. रुग्णावर उपचार सुरू असताना ही घटना घडल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनावर आपला रोष व्यक्त केला आहे. यात मध्यवर्ती रुग्णालयाचे प्रशासन जबाबदार असल्याचा धक्कादायक आरोप रुग्णाच्या पत्नीने केला आहेत; मात्र वार्डमध्ये असलेल्या इतर रुग्णांच्या नातेवाईकांनी मयत रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांची चूक असल्याची माहिती दिली आहे.

या प्रकरणी रुग्णालय प्रशासनाला विचारले असता, पीडब्ल्यूडीने जाळी बसवून दिली नाही, म्हणून हा रुग्ण टेरेसवर पोहोचला आणि तिथे त्याला हृदयविकाराच्या झटका आला असावा, आणि म्हणून त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. मनोहर बनसोडे यांनी व्यक्त केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in