पेणवासीय पाणीटंचाईमुळे त्रस्त; गावांसाठी २ कोटी १५ लाखांचा आराखडा, १० टँकर्सची मागणी

पेण पंचायत समितीमार्फत २०२४-२५ या वर्षासाठी ५४ गावे व १८९ वाड्यांवर टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी २ कोटी १५ लाख रुपयांचा आराखडा तयार केला असून या आराखड्यानुसार शासनाकडे ७ टँकरची मागणी करण्यात आली होती, मात्र ६ टँकर उपलब्ध झाले असून यातील फक्त ४ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.
पेणवासीय पाणीटंचाईमुळे त्रस्त; गावांसाठी २ कोटी १५ लाखांचा आराखडा, १० टँकर्सची मागणी

अरविंद गुरव/ पेण

पेण तालुक्यातील खारेपाट विभाग गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाणीटंचाईला सामोरे जात आहे. यावेळी २०२४-२५ च्या पाणी आराखड्यात २ कोटी १५ लाख रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून खारेपाट्यातील या ५४ गावांसह १८९ वाड्यांसाठी पेण पंचायत समितीकडून फक्त ४ टँकर सुरू असल्याने पाणीटंचाईची समस्या दूर होणार तरी कधी? याचीच प्रतीक्षा गेल्या प्रदीर्घ काळापासून येथील नागरिक करत आहेत.

पेण तालुक्यातील सरेभाग, मसद, शिर्डीचाळ नंबर १ यामधील खारेपाट विभागातील वाशी, वढाव, भाल, काळेश्री, विठ्ठलवाडी, बोझें लाखोले, बहिराम कोटक, तामसीबंदर, तुकाराम वाडी, कान्होंबा या गावांसह बळवली ग्रामपंचायत हद्दीतील दर्गावाडी निगडावाडी, भेंडीवाडी येथील अनेक वाड्या वस्त्या पाणीटंचाईला सामोरे जात आहेत. त्यामुळे या टंचाईग्रस्त भागातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी पेण पंचायत समितीमार्फत २०२४-२५ या वर्षासाठी ५४ गावे व १८९ वाड्यांवर टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी २ कोटी १५ लाख रुपयांचा आराखडा तयार केला असून या आराखड्यानुसार शासनाकडे ७ टँकरची मागणी करण्यात आली होती, मात्र ६ टँकर उपलब्ध झाले असून यातील फक्त ४ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

यातील २ टँकरची परवानगी अजून आली नसल्याने खारेपटातील ५४ गावांसह १८९ वाड्या वस्त्यांना शासनाकडून ४ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप निर्माण होत आहे.

पेण खारेपाट भागातील पाणीटंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी शासनाकडे आराखड्यानुसार टँकरची मागणी करण्यात आली होती, मात्र यावेळी सहा टँकर उपलब्ध झाले आहेत. त्यातील चार टँकर सुरू असून दोन टँकरना लवकरच परवानगी मिळणार आहे. यावर्षीचा दोन कोटी पंधरा लाखांचा आराखडा तयार असून त्यानुसार वाशी सरे भागासह बळवली हद्दीतील दर्गावाडी व इतर वाड्यांवर टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे.

- भाऊसाहेब पोळ, बीडीओ, पेण

पेण खारेपाट पाणीटंचाईग्रस्त विभागाकरिता सरकारने ३८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करूनही मात्र, ठेकेदार एम. के. फर्म सक्षम नसल्याने पाइपलाईनची कामे रेंगाळली आहेत. जर ही पाणीपुरवठा योजना त्याचवेळी पूर्ण झाली असती तर संपूर्ण खारेपाटाला मुबळक पिण्याचे पाणी मिळाले असते. मात्र आमच्या खारेपाट विभागातील स्थानिक तरुणांच्या आमरण उपोषणामुळे आता सिंचनासाठी राज्य शासनाने ७६६ कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याचे काम योग्य झाले की पाणीपुरवठा सुरळीत होईल. पण आता सुरू असलेले टँकरची संख्या वाढवून प्रशासनाने किमान १० टँकर उपलब्ध करून पेण तालुक्याला पाणीपुरवठा करावा.

- विनोद शांताराम म्हात्रे, जिल्हा समन्वयक, युवासेना उबाठा गट

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in