पेणला पाणीटंचाईची झळ; तालुक्यात ५८ वाड्या, ६ गावांची पिण्याच्या पाण्यासाठी धडपड

पेण शहरापासून ६ ते ७ किलोमीटर अंतरावर असलेल्या खारेपाट या विभागातील महिलांची. येथील महिलांना पिण्यासाठी हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याचे चित्र आहे.
पेणला पाणीटंचाईची झळ; तालुक्यात ५८ वाड्या, ६ गावांची पिण्याच्या पाण्यासाठी धडपड

अरविंद गुरव/पेण

"जनावरं तरी बरी असं आमचं जगणं झालंय, सकाळीच पहिला पाण्याचा काम करायचा, मग सयपाक अन् बाकी काम', कधी कधी अख्खा दिवसच पाण्यासाठी थांबावं लागतंय, पाण्यासाठीच दिवस घालवला, तर मजुरीचं काय? अन् कामावरच न्हाय गेलू त खायचा काय, अशी परिस्थिती झालीय..." असा एकंदरीत पाण्यासाठीचा संघर्षच डोक्यावर हंडा घेऊन घराची वाट कापत जाणाऱ्या महिलेने कथन केला. ही परिस्थिती आहे, पेण शहरापासून ६ ते ७ किलोमीटर अंतरावर असलेल्या खारेपाट या विभागातील महिलांची. येथील महिलांना पिण्यासाठी हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याचे चित्र आहे.

उन्हाळा म्हटला की, ग्रामीण भागातील पहिली समस्या निर्माण होते ती म्हणजे पाण्याची. दरवर्षी उन्हाळ्यात महिलांना एक-एक, दोन-दोन किलोमीटर पायपीट करून हंडाभर पाणी मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. रायगड जिल्ह्यात मागील वर्षी पुरेशा प्रमाणात पाऊस पडला असला, तरी प्रशासनाने पाण्याचे योग्य नियोजन न केल्याने सर्वदूर भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांतील पाणीटंचाई सोडविण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. जिल्ह्यात पाणीटंचाईची झळ सर्वात जास्त पेण तालुक्याला जाणवू लागली आहे. हेटवणे धरण अवघ्या काही अंतरावर असतानाही पेण तालुक्यातील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते ही जिल्हा प्रशासनासाठी शरमेची बाब आहे.

पेण तालुक्यातील अनेक ठिकाणी जलजीवन मिशन योजनेची कामे संथ गतीने सुरू आहेत. परंतु बऱ्याच ठिकाणी मात्र अर्धवट अवस्थेत असल्याने, तर कुठे निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याने अनेक ठिकाणी पाणी समस्यांना ग्रामस्थांना सामोरे जावे लागत आहे. तालुक्यातील ६ गाव आणि ५८ वाड्यांना ५ दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. ५ दिवसाआड पाणी येत असल्याने कपडे धुणे, आंघोळ कशी करायची? पाणी कसे पुरेल, भांडी धुवायची की नाही? पाणी पिण्यासाठी साठवायचे की गरजा भागवण्यासाठी? असा संतप्त सवाल ग्रामस्थ करत आहेत.

२ कोटी १४ लाख ५० हजारांचा पाणीटंचाई आराखडा

पेण पंचायत समिती प्रशासनाकडून यावर्षी मार्च ते जून महिन्यापर्यंत टंचाईग्रस्त गावांसाठी तब्बल २ कोटी १४ लाख ५० हजारांचा संभाव्य पाणीटंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये ५४ गावे, १९० वाड्यांचा टंचाई आराखड्यात समावेश आहे. टंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी तब्बल १ कोटी ८५ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, तर पाच नळपाणी पुरवठा योजनांची दुरुस्तीसाठी २९ लाख ५० हजार रुपयांची तरतूद केली आहे. सद्यस्थितीत ६ गावे, ५८ वाड्यांवर फक्त ९ टँकरने मार्च महिन्यापासून पाणीपुरवठा सुरू झाला असल्याचे पंचायत समिती पाणीपुरवठा टँकर पुरवठा विभागाचे कांबळे यांनी सांगितले.

हेटवणे धरणाचे पाणी शाहांपाडा धरणात सोडायचे ही वाढीव उद्धव योजना सुरू करायची होती, परंतु अजून सुरू केलेली नाही. अनेक भागांत पाणीपुरवठा ५ दिवसांनंतर केला जात आहे. ही समस्या गेली २५ ते ३० वर्षांपासून समस्या उद‌्भवत आहे. जर लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष दिले असते, तर या तालुक्यात पाणीटंचाई समस्या राहिलीच नसती. फक्त लोकप्रतिनिधी राजकारण करण्यासाठी पाणी विषय हाती घेत आहेत. परंतु पेण खारेपाटचा पाणीप्रश्न सोडवण्याकडे दुर्लक्षच होत आहे.

- विनोद म्हात्रे, जिल्हा समन्वयक, युवासेना उबाठा गट, वढाव-पेण

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in