गावगाडा हाकण्यासाठी सरपंचांची एकी; लोकनियुक्त सरपंच पालघर तालुक्याला बनवणार विकासाचे मॉडेल

सरपंचाने कुठल्याही राजकीय पक्षाची बूज न ठेवता केवळ ग्राम विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवावे,जे लोकप्रतिनिधी ग्रामविकासाच्या कामासाठी सरपंचांना सहकार्य करतील
गावगाडा हाकण्यासाठी सरपंचांची एकी; लोकनियुक्त सरपंच पालघर तालुक्याला बनवणार विकासाचे मॉडेल
Published on

संतोष पाटील/ वाडा : गावगाडा कसा चालवायचा, गावातील प्रश्न कसे सोडवायचे, अधिकाऱ्यांचा विश्वास कसा संपादन करायचा, गावाच्या विकासासाठी निधी कुठून आणायचा याबाबत अनेक सरपंच अनभिज्ञ असतात. सरपंचांना आपल्या शक्ती आणि बळाचा विसर पडू नये, ग्रामपंचायतींना केंद्र सरकारकडून थेट मिळणारा निधी, सरपंचांचे अधिकार, त्यांचे काम, ग्रामविकासाचे विविध प्रस्ताव, वेगवेगळ्या मार्गांनी मिळणारा निधी, तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या अडचणी आदी बाबतीत सरपंच परिषदेचे अध्यक्ष हेमंत संखे यांनी पुढाकार घेऊन पालघर तालुक्यातील १३३ असून, ८० ग्रामपंचायतीच्या सरपंचांना यावेळी मार्गदर्शन केले.

राज्यात हिवरे बाजार, राळेगण सिद्धी, पाटोदे अशा गावांनी दिलेली दिशा लक्षात घेऊन सरपंचांनी विकासाची दिशा घ्यावी, त्यासाठी अभ्यासदौरा करावा, यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. सरपंच हा ग्रामविकासाचा दूत असतो. लोकांतून तो निवडून येत असतो. त्यामुळे लोकांच्या विकासाची जबाबदारी त्याच्यावर असते. या पार्श्वभूमीवर लोकनियुक्त सरपंचाने कुठल्याही राजकीय पक्षाची बूज न ठेवता केवळ ग्राम विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवावे,जे लोकप्रतिनिधी ग्रामविकासाच्या कामासाठी सरपंचांना सहकार्य करतील, त्यांच्या पाठीशी राहण्याचा असा सल्ला या परिषदेत हेमंत संखे यांनी दिला. सहकार्याची भूमिका न घेणाऱ्यांना धडा शिकवायचा निर्धार या वेळी करण्यात आला. सरपंचांची पालघर जिल्ह्यात प्रभावी अशी संघटना नाही. त्यामुळे संखे यांनी पंचायत समितीच्या सभागृहात याबाबतची माहिती देण्यासाठी सरपंचांना एकत्र येण्याच आवाहन केले होते.

logo
marathi.freepressjournal.in