जनता हीच माझी ऊर्जा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

मागील दीड वर्षात १८० कोटी रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातर्फे देण्यात आली.
जनता हीच माझी ऊर्जा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

भाईंंदर : जनतेला भेटल्यानंतर मला काम करण्याची ऊर्जा मिळते. जनतेची सेवा या ध्येयानेच मी काम करत आहे. यासाठीच शासनाच्या माध्यमातून जनतेला उत्तम दर्जाची आरोग्य सेवा देण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मीरारोड येथे झालेल्या कार्यक्रमात केले.

मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रातील ‘मूलभूत सोयीसुविधांचा विकास’ या योजनेंतर्गत महाजनवाडी, मीरा रोड येथे उभारण्यात आलेल्या ‘मातोश्री इंदिराबाई बाबूराव सरनाईक सुपरस्पेशालिटी’ (कॅशलेस काऊंटर) रुग्णालय तसेच महापालिकेने दिव्यांगांच्या उपचारासाठी उभारलेल्या ‘फिजिओथेरपी आणि बहुविद्याशाखीय पुनर्वसन केंद्रा’चे ई-अनावरण व लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले तसेच जिल्हा वार्षिक नियोजनच्या निधीतून मीरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालयासाठी खरेदी केलेली वाहने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पोलीस आयुक्तालयाला सुपूर्द करण्यात आली. सुरुवातीला मुख्यमंत्र्यांनी कोनशिलेचे अनावरण केले आणि रुग्णालयाची पाहणी केली.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, लोकार्पण केलेले रुग्णालय पंचतारांकित दर्जाचे आहे. या माध्यमातून लोकांना उत्तम आरोग्य सेवेचा लाभ मिळणार आहे, याचे समाधान वाटते. ते म्हणाले की, नवनवीन विकास कामे सुरू आहेत. दहिसर ते डहाणू, विरार ते अलिबाग कॉरिडॉर मार्गाचे काम हाती घेतले आहे. ॲक्सेस कंट्रोल, ग्रीन फील्ड पद्धतीने पनवेल-गोवा महामार्गासह इतरही महामार्गाचे काम लवकरच पूर्ण होतील. गरजू रुग्णांना कॅशलेस सेवेमुळे आवश्यक उपचार विनामूल्य मिळणार आहेत. शासनाने महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत दीड लाख रुपयांच्या मर्यादेत पाच लाख रुपयांपर्यंत वाढ केली. मागील दीड वर्षात १८० कोटी रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातर्फे देण्यात आली. क्लस्टर विकास योजनेला मंजुरी देऊन त्यातून गरजू लोकांना घरे देत आहोत.

पत्रकारांसाठी घरे या विषयाबाबतही योग्य निर्णय घेऊ

राज्यातील शाळा चांगल्या सर्व सोयीसुविधायुक्त असाव्यात, त्या माध्यमातून मुलांना चांगले शिक्षण मिळावे,यासाठीही राज्य शासन प्रयत्नशील आहे. शेवटी उत्तम काम करीत असल्याबाबत आमदार प्रताप सरनाईक, आमदार गीता जैन यांचे अभिनंदन करून मीरा-भाईंदर या शहरातही ‘कॅन्सर हॉस्पिटल’ उभे करू. त्याचप्रमाणे ‘पत्रकारांसाठी घरे’ या विषयाबाबतही योग्य निर्णय घेऊ, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in