भिवंडीत अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ

कल्याण पूर्वेतील घराच्या परिसरातून बेपत्ता झालेल्या १२ वर्षीय अल्पवयीन मुलीचा कल्याण-पडघा मार्गावरील भिवंडी तालुक्यातील बापगाव येथील कब्रस्तान परिसरात मृतदेह आढल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
भिवंडीत अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ
Published on

भिवंडी : कल्याण पूर्वेतील घराच्या परिसरातून बेपत्ता झालेल्या १२ वर्षीय अल्पवयीन मुलीचा कल्याण-पडघा मार्गावरील भिवंडी तालुक्यातील बापगाव येथील कब्रस्तान परिसरात मृतदेह आढल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात अपहरण आणि हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृतक अल्पवयीन १२ वर्षीय मुलगी कल्याण पूर्वेतील चक्की नाका भागातील एका चाळीत ही कुटुंबासह राहत होती. त्यातच २३ डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजल्याच्या सुमारास मुलगी घराच्या परिसरातून अचानक बेपत्ता झाली. मुलगी बेपत्ता झाल्याने तिचा परिसरात व नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र कुठेही आढळून आली नाही. त्यामुळे तिच्या आईच्या तक्रारीवरून कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, बेपत्ता मुलीचा शोध सुरू असतानाच मंगळवारी २४ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास कल्याण­-पडघा मार्गावरील भिवंडी तालुक्यातील बापगाव येथील कब्रस्तान परिसरात निर्जनस्थळी तिचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती पडघा पोलिसांना मिळताच पोलीस पथक फॉरेन्सिक पथकासह घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबई येथील जे. जे. रुग्णालयात रवाना करून अज्ञात आरोपी विरोधात अपहरण आणि हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांनी दिली आहे. दुसरीकडे मृत मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याचा कयास पोलीस पथकाकडून व्यक्त केला जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in