प्रतिनिधी /ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात प्रभाग समितीनिहाय, तात्पुरते बॅनर आणि पोस्टर लावण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार, तात्परुते बॅनर, पोस्टर लावण्यासाठी एकूण २०४ जागा ठरविण्यात आल्या आहेत. महापालिकेची ऑनलाइन परवानगी घेऊन त्यानुसार भाडे भरल्यावर या जागांवर तीन दिवसांपर्यंत पोस्टर, बॅनर लावण्याची परवानगी मिळणार आहे.
नगरविकास विभागाच्या शासन निर्णय क्र. याचिका -३०१७/ प्र. क्र. १३०/ नवि-२२ दि. १४.१०.२०२२च्या नुसार महापालिका क्षेत्रामध्ये होर्डिंग्ज, फ्लेक्स, बॅनर्स, पोस्टर्स लावण्यासाठी जागा निश्चित करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले होते. त्यानुसार, महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिलेल्या निर्देशानुसार, ठाणे महानगरपालिकेने होर्डिंग्ज, फ्लेक्स, बॅनर्स, पोस्टर्स इत्यादी प्रकारच्या तात्पुरत्या जाहिराती लावण्यासाठी जागा निश्चित केल्या. त्यासाठी पोर्टल तयार केले आणि या प्रकारच्या जाहिरातींवर लावण्यासाठी क्यू आर कोड उपलब्ध होतील, अशी व्यवस्था केली असल्याची माहिती उपायुक्त (जाहिरात) महेश सागर यांनी दिली. ही एक खिडकी योजना असून परवानगी घेण्यासाठी महापालिकेच्या कोणत्याही कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. ऑनलाइन पद्धतीनेच ही परवानगी दिली जाणार आहे, असेही महेश सागर यांनी स्पष्ट केले.
अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभाग, जाहिरात विभाग आणि सर्व प्रभाग समितींचे सहाय्यक आयुक्त यांनी प्रभाग समितीनिहाय तात्पुरते फलक लावण्यासाठी जागा निश्चित केल्या. त्यात माजिवडा-मानपाडा (५२), लोकमान्य नगर- सावरकर नगर (१९), वर्तकनगर (०६), कळवा (०५), वागळे (१९), मुंब्रा (५), उथळसर (१५), दिवा (४०), नौपाडा (२२), कोपरी (२१) अशा एकूण २०४ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.
'अशी' होणार भाडे आकारणी
तात्पुरत्या जाहिरातींसाठी ८ बाय ६, ८ बाय ३ आणि ६ बाय ३ असे तीन प्रकार निर्धारित करण्यात आले असून, त्यांच्यासाठी प्रति दिन, प्रति चौ.फूट १०० रुपये याप्रमाणे भाडे आकारले जाणार आहे. या जाहिरातींसाठी परवानगी घेण्यासाठी https://tmc.advertisepermission.in/या वेब पोर्टलवर अर्ज करता येईल. त्यात आवश्यक त्या जागा, फलकाचा आकार ही माहिती भरल्यानंतर किती भाडे भरावे लागेल याची माहिती येईल. त्यानुसार, ऑनलाईन भाडे भरल्यावर क्यूआर कोड तयार होईल. हा क्यूआर कोड तात्पुरत्या जाहिरातींवर लावणे बंधनकारक असल्याचे उपायुक्त महेश सागर यांनी सांगितले. ठाणे महापालिका क्षेत्रात अनधिकृत पोस्टर्स, बॅनर्स यांना आळा घालण्यासाठी ही परवानगीची प्रणाली विकसित करण्यात आली आहे.