
कोरोना महामारीच्या निर्बंधानंतर प्रथमच मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे महानगरपालिका निवडणुका तोंडावर आल्या असल्याने गणेशोत्सवाचा राजकीय लाभ मिळवण्याचा प्रयत्न राजकीय नेत्यांनी सुरू केला आहे. बुधवारी गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिवसभर ठाण्यात होते तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनीही ठाण्यात येऊन ठिकठिकाणच्या गणेशोत्सवाला हजेरी लावली. दुसरीकडे माजी गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या नरवीर तानाजी मित्र मंडळाच्या गणेशोत्सवाबरोबरच, कळवा, खारेगावातील कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन श्रीगणेशाला साकडे घातले.
काही वर्षांपूर्वी दहीहंडी उत्सवावर निर्बंध आणणारा निकाल न्यायालयाने दिल्याने गोविंदा पथकांमध्ये नाराजी पसरली होती. आणि फक्त हिंदूंच्या सणावरच निर्बंध का? असा एल्गार करत राज ठाकरे यांनी तुम्ही दहीहंडी परंपरागत पद्धतीने खेळा मी कोर्टाचे बघतो अशी जाहीर भूमिका घेतली होती. त्यामुळे चार वर्षांपूर्वी मनसेने आयोजित केलेल्या बहुतांशी दहीहंडी उत्सवात चारपेक्षा जास्त थर लावले गेले.
ठाण्याच्या भगवती मैदानात तर खुलेआम कायदे मोडले गेले. पोलिसांच्या समोर ९ थर लावले गेले. मात्र यामुळे युवकांमध्ये मनसेची क्रेज पुन्हा एकदा वाढली असून ती लोकप्रियता कॅश करण्यासाठी राज यांनी ठाण्यात येऊन आपल्या पदाधिकाऱ्यांना शाबासकी देण्याबरोबरच ज्या गोविंदा पथकांविरोधात गुन्हे दाखल झाले होते, त्यांचीही भेट घेतली होती. तेव्हापासून दरवर्षी भगवती मैदानातील दहीहंडी उत्सवाची लोकप्रियता वाढली असून २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांनी आमदार संजय केळकर यांच्या विरोधात तगडी लढत दिली होती.
हाच इतिहास पाहता सार्वजनिक उत्सवांच्या माध्यमातून थेट मतदारांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सर्वच राजकीय पक्षांकडून सुरू आहे. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. ठाण्याचे एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले असल्याने ठाण्यात राजकीय चैतन्य निर्माण झाले आहे.
बुधवारी वर्षावर श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करून ते थेट ठाण्यात आले आणि आपल्या शुभदिप बंगल्यातील गणेशाचे पूजन केले. त्यानंतर विविध सार्वजनिक मंडळे आणि स्थानिक कार्यकर्ते पत्रकार यांच्या घरातील गणपतींचे गुरुवारी पहाटेपर्यंत मुख्यमंत्र्यांचा गणेश दर्शन सोहळा सुरू होता.
विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रात्री ठाण्यात आले त्यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि भाजप शहर अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांच्या घरी जाऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले. पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटीलही त्यांच्यासोबत होते. अशा प्रकारे गणेशोत्वाच्या पहिल्या दिवसापासूनच राजकीय प्रसाद मिळवण्याचे प्रयत्न राजकीय नेत्यांनी सुरू केले आहेत.