शहरात शांतता राखण्याचा पोलिसांचा निर्धार

कायदा-सुव्यवस्था बिघडवणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई पोलीस करणार असल्याचा इशारा पोलीस आयुक्तांनी दिला
शहरात शांतता राखण्याचा पोलिसांचा निर्धार

भाईंंदर : मीरारोडच्या नया नगरमधील दोन गटातील वादानंतर शहरात अनेक भागात सुरू झालेल्या तोडफोड, मारहाणीच्या घटनांच्या अनुषंगाने मीरा-भाईंदर शहरात शांतता नांदावी, यासाठी शहरातील लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे प्रमुख व पोलीस आणि महापालिका अधिकारी यांची संयुक्त बैठक भाईंदरच्या नगरभवनमध्ये पार पडली. बैठकीत सर्वच राजकारण्यांनी शहरात शांतता राखण्यासाठी सर्व ते प्रयत्न करणार असल्याचा निश्चय व्यक्त केला. तर जाती धर्मात तेढ निर्माण करणाऱ्या व कायदा-सुव्यवस्था बिघडवणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई पोलीस करणार असल्याचा इशारा पोलीस आयुक्तांनी दिला आहे.

सर्वपक्षीय नेते व प्रशासन अधिकारी, पत्रकार यांची उपस्थिती

बैठकीला मीरा-भाईंदर,वसई-विरारचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेय, महापालिका आयुक्त संजय काटकर,आमदार प्रताप सरनाईक व गीता जैन, पोलीस उपायुक्त जयंत बजबळे, सहाय्यक पोलीस आयुक्त दीपाली खन्ना, माजी आमदार मुझफ्फर हुसेन व नरेंद्र मेहता, भाजपचे मीरा-भाईंदर निवडणूक निर्णय प्रमुख ॲड. रवी व्यास व शिवसेनेचे विक्रमप्रताप सिंह, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजू भोईर, ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष मोहन पाटील, शरद पवार गटाचे ॲड. विक्रम तारे पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष किशोर शर्मा, आरपीआय जिल्हाध्यक्ष देवेंद्र शेलेकर, मनसेचे शहर अध्यक्ष संदीप राणे, माजी महापौर ज्योत्स्ना हसनाळे आदी बैठकीत उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in