Ullhasnagar : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस सज्ज; वाहनांची कसून तपासणी, कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी कडक उपाययोजना

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच कायदा-सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.
Ullhasnagar : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस सज्ज; वाहनांची कसून तपासणी, कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी कडक उपाययोजना
Published on

उल्हासनगर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच कायदा-सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.

ठाणे आयुक्तालय क्षेत्रात शहर पोलिसांच्या बंदोबस्तासह केंद्रीय पोलीस दलाच्या सात तुकड्या, तपासणी नाके, भरारी पथके तैनात करण्यात आली आहे. तसेच संवेदनशील मतदारसंघात रुट मार्च देखील काढला जात आहे. रात्रीच्या वेळात पोलिसांच्या पथकांकडू गस्ती घातली जात आहे. अमली पदार्थ, बेहिशेबी रक्कम आणि बेपरवाना शस्त्रांची तस्करी या सगळ्यांवर पोलिसांचे लक्ष आहे.

निवडणूक शांततेत, पारदर्शकपणे आणि नि:पक्षपणे पार पडावी, यासाठी उल्हासनगर पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांनी वाहनांची कसून तपासणी सुरू केली आहे. चार नंबर भागातील श्रीराम चौक परिसरात विशेष सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून, येथे येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची तपासणी करून शहरात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची सतर्कता दिसून येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांकडून वाहन तपासणी दरम्यान कोणत्याही प्रकारच्या अवैध शस्त्रांची वाहतूक होत नाही याची खात्री केली जात आहे. याशिवाय, निवडणूक काळात मतदारांना आकर्षित करण्यासाठी वापरले जाणारे रोख रक्कम, दारू, अथवा इतर प्रचार साहित्याची वाहतूक रोखण्यासाठीही पोलिसांची विशेष नजर आहे. यातून निवडणूक प्रक्रियेवर कोणताही दबाव किंवा प्रभाव टाळण्याचा उद्देश आहे. पोलीस उपायुक्त सचिन गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल कोळी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांच्या उपस्थितीत पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.

“नाकाबंदी आणि तपासणीमुळे निवडणूक काळात कोणतेही अनुचित प्रकार घडणार नाहीत, याची आम्हाला खात्री वाटते,” असे स्थानिक नागरिकांनी सांगितले. नाकाबंदीमुळे शहरातील रस्त्यांवर पोलिसांची मोठी उपस्थिती दिसून येत आहे. पोलिसांचे पथक विविध ठिकाणी तैनात आहे, आणि शहराच्या विविध भागांत गस्ती पथकही सक्रिय करण्यात आले आहे. वाहन तपासणी दरम्यान नागरिकांच्या सहकार्याचीही अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे, जेणेकरून निवडणुकीचे वातावरण शांततेत पार पाडता येईल. उल्हासनगर शहरात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उचललेल्या या पावलांमुळे निवडणुकीची प्रक्रिया पारदर्शक आणि सुरक्षित राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे. पोलिसांनी नागरिकांना शांतता आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

विधानसभा जाहीर झाल्यानंतर मोठ्या बंडखोरीचे फटाके दिवाळीत फुटल्याचे पहावयास मिळत होते. सोमवारी उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख उलटल्यानंतर आता खऱ्या अर्थाने प्रचाराला आणि गाठीभेटींना सुरुवात होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in