फार्महाऊसवरील जुगार अड्ड्यांवर पोलिसांची धाड

शहरात फार्महाऊसवर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून जुगार खेळणाऱ्या २६ जणांवर गुन्हे दाखल केले आहे.
फार्महाऊसवरील जुगार अड्ड्यांवर पोलिसांची धाड

कर्जत : शहरात फार्महाऊसवर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून जुगार खेळणाऱ्या २६ जणांवर गुन्हे दाखल केले आहे. या धाडी दरम्यान, पोलिसांनी नऊ लाखांची रोकड जप्त केली असून धाडीत सहा गाड्या असा ५५ लाखांचा ऐवज ताब्यात घेण्यात आले आहे. जुगार खेळणारे सर्वजण मुंबई, ठाणे, पुणे, गुजरात येथील उच्चभ्रू सोसायटीतील राहणारे आहेत.

पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास कर्जत नांनामास्तर नगर येथील उल्हास नदीच्या काठावर ककु फार्महाऊस येथे मोठ्या प्रमाणात जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी पहाटेच्या सुमारास धाड टाकली असता, तिथे मोठ्या प्रमाणात जुगार सुरू असल्याचे दिसले. पोलिसांची धाड पडल्यानंतर तिथे जुगार खेळत असणारे काहीजण पळून जाण्यात यशस्वी झाले, तर एकूण २६ जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन प्रतिबंधात्मक नोटीस देऊन सोडून दिले व न्यायालयात हजर राहण्यास सांगितले. त्यानुसार ते सर्वजण न्यायालयात हजर झाले असता, त्यांना न्यायालयाने जामिनावर सोडून दिले. या कारवाईत नऊ लाख अठरा हजार एकशे सत्तरा रुपये रोकड, तर सहा मोठ्या गाड्या जप्त केल्या आहेत, असा एकूण ५५ लाख रुपये एवढा ऐवज पोलिसांनी ताब्यात घेतला. प्रामुख्याने कारवाई करण्यात आलेले आरोपी हे मुंबई, ठाणे, पुणे, गुजरात येथील उच्चभ्रू सोसायटीतील राहणारे असून ते जुगार खेळण्यासाठी कर्जत येथे आले होते. या धाडीच्या ठिकाणी कर्जतचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांनी भेट दिली असून, पुढील तपास सहाय्यक निरीक्षक गावडे करीत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in