कल्याण : ऑनलाइन लॉटरीच्या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या अधिवेशनात ऑनलाइन जुगार बंद करा, असे स्पष्टपणे सांगितले होते. कल्याणमध्ये जुगार माफियाकडून ऑनलाइन लॉटरी सुरू असून या ऑनलाइन लॉटरी अड्ड्यांवर कल्याण परिमंडळ-३ पोलिसांनी एकाच वेळी तीन ठिकाणी छापे टाकून मोठी कारवाई करत लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कल्याण पश्चिमेतील बाजार पेठ पोलिसांनी पहिला छापा गोल्डन पार्कजवळील ऑनलाइन लॉटरी अड्ड्यावर टाकून संदीप गायकवाड, कार्तिक तावडे, प्रवीण मुंडे यांच्यासह ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी ऑनलाइन लॉटरीसाठी लागणाऱ्या सामग्री व लाखोचा माल ही जप्त करण्यात आला आहे.
कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मासूम बेकरीजवळ ऑनलाइन जुगार सुरू होता. याठिकाणी पोलिसांनी छापा मारत दोन ते तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तिसरा छापा कल्याण बेतुर पाळण्यात परिसरात कल्याण महात्मा फुले पोलिसांनी मारला. यात चार ते पाच जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार या सर्व धंद्याचा मूळ सूत्रधार संदीप गायकवाड असून त्याचा शोध सुरू आहे. मात्र छापा टाकून या प्रकरणात कोणालाही अटक न झाल्याने परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.