पोलीस ठाण्यातील फायरिंगने राजकारण तापले, आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तीन जण अटकेत

पोलीस ठाण्यातील फायरिंगने राजकारण तापले, आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तीन जण अटकेत

शुक्रवारी रात्रीच्या सुमारास उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या कॅबिनमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यात रक्तरंजित राडा झाला.

उल्हासनगर : शुक्रवारी रात्रीच्या सुमारास उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या कॅबिनमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यात रक्तरंजित राडा झाला. यावेळी गणपत गायकवाड आणि त्यांचे खासगी सुरक्षारक्षक असलेले हर्षल केणे यांनी महेश गायकवाड यांच्यावर अंदाधुंद फायरिंग केली. या घटनेने उल्हासनगरसह आजूबाजूच्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर प्रकरणाचा तपास ठाणे गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे.

शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील द्वारली गावातील एकनाथ जाधव यांच्या जमिनीच्या वादाच्या संबंधाने भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड हा आपल्या कार्यकर्त्यांसह आला होता. त्यानंतर सदर जमिनीच्या संबंधाने शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड, राहुल पाटील व चैनू जाधव कार्यकर्त्यांसह तक्रार देण्यासाठी आलेले होते.

दोन्ही गटाचे समर्थक हे पोलीस ठाण्याच्या बाहेरील बाजूस एकमेकांशी वाद करून आरडाओरडा करीत होते. त्यामुळे पोलीस ठाण्यात गोंधळ निर्माण झाला होता. त्यानंतर हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या दालनात महेश गायकवाड, राहुल पाटील व चैनू जाधव हे बसले. थोड्याच वेळात आमदार गणपत गायकवाड हे देखील जगताप यांच्या कॅबिनमध्ये येऊन बसले. त्या दरम्यान पोलीस ठाण्याच्या बाहेरील आवारात दोन्हीकडील कार्यकर्त्यांमध्ये आरडाओरड व गोंधळ सुरू झाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप हे त्यांच्या दालनाबाहेर परिस्थिती हाताळण्यासाठी गेलेले असताना केबीनमध्ये बसलेले आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड व राहुल पाटील यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने अचानकपणे त्यांच्यावर रिव्हॉल्व्हरने फायरिंग सुरू केली. यात गायकवाड यांनी महेश गायकवाड व राहुल पाटील यांच्या दिशेने छातीवर गोळ्या झाडून त्यांना गंभीर जखमी केले.

फायरिंगच्या आवाजामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप हे पुन्हा दालनात आले. त्यावेळी आमदार गणपत गायकवाड हे महेश गायकवाड याच्या अंगावर बसून त्यांना रिव्हॉल्व्हरच्या बटने मारहाण करीत होते. त्यावेळी अनिल जगताप यांनी प्रतिकार करून गणपत गायकवाड यांच्या हातातील रिव्हॉल्व्हर हिसकावून घेतले. त्याचवेळी आमदार गायकवाड यांचा खासगी अंगरक्षक हर्षल केणे याने दालनात येऊन त्याच्याकडील रिव्हॉल्व्हरने महेश गायकवाड यांच्यावर अंदाधुंद गोळ्या झाडणे सुरू केले.

दरम्यान, इतर पोलीस अधिकारी व अंमलदारांनी त्यांच्याकडील रिव्हॉल्व्हर हिसकावून आरोपींना ताब्यात घेतले. जखमी महेश गायकवाड व राहुल पाटील यांना तत्काळ प्राथमिक उपचारासाठी उल्हासनगरच्या मीरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.

या प्रकरणी तक्रारदार चैनू जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हिललाईन पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम ३०७, १२० ब, १४३,१४७, १४८, १४९, १०९, ३२३, ५०४ सह शस्त्र अधिकलम ३० प्रमाणे आरोपी आमदार गणपत गायकवाड, हर्षल केणे, संदीप अनंत सरवणकर, वैभव गायकवाड, नागेश बडेकर, विकी गणोत्रा व इतर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आतापर्यंत सदर गुन्ह्यात गणपत गायकवाड, अंगरक्षक हर्षल केणे, संदीप सरवणकर या आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनावणे हे करीत आहेत.

१४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

सुरक्षेच्या कारणास्तव व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणारी सुनावणी न्यायालयाने अमान्य केल्यानंतर शनिवारी संध्याकाळी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तिन्ही आरोपींना उल्हासनगर सत्र न्यायालयात कडक बंदोबस्तात हजर करण्यात आले होते. त्यानंतर न्यायालयीन सुनावणीनंतर तिन्ही आरोपींना १४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे यांनी दिली आहे.

कोर्टात काय घडले?

पोलीस मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली काम करत आहेत, असा थेट आरोप न्यायालयातच भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केला आहे. गोळीबार प्रकरणात माझा मुलगा आरोपी नसून त्यालाही आरोपी बनवण्यात आले आहे, असं देखील गायकवाड यांनी म्हटले आहे. माझ्यासारख्या माणसाला कायदा हातात का घ्यावा लागला? असा प्रश्न देखील त्यांनी न्यायालयात उपस्थित केला. यावेळी पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं की, गणपत गायकवाड यांनीच महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. गोळीबारानंतर बंदूक जप्त करण्यात आली आहे. प्रथमदर्शनी हा सुनियोजित कट असल्याचे दिसते, असे देखील पोलिसांनी न्यायालयात सांगितले. तसेच आमदार गणपत गायकवाड यांच्या आवाजाची चाचणी घ्यायची आहे. त्यामुळं त्यांना १४ दिवसांची कोठडी द्यावी, अशी मागणी पोलिसांनी न्यायालयात केली आहे. मात्र, त्यावर न्यायालयाने गणपत गायकवाड यांना ११ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

logo
marathi.freepressjournal.in