२०१९ च्या विधानसभा निवडणुकी पासूनच शिवसेनेत फूट पडण्याची राजकीय खेळी

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून ते खिळखिळे व्हावे, यासाठी अगदी पहिल्या दिवसापासून भाजपकडून प्रयत्न सुरु होते
२०१९ च्या विधानसभा निवडणुकी पासूनच शिवसेनेत फूट पडण्याची राजकीय खेळी

एकनाथ शिंदे यांच्या गटात ४० आमदार असल्याचे सांगण्यात येत असल्याने राज्यात येत्या काही दिवसांत सत्तांत्तर होणार, हे जवळपास उघड होऊ लागले आहे. विशेष म्हणजे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून ते खिळखिळे व्हावे, यासाठी अगदी पहिल्या दिवसापासून भाजपकडून प्रयत्न सुरु होते. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या ईडी चौकशा, दोन मंत्र्यांना अटक, अनिल परब यांच्यावर अटकेची टांगती तलवार, संजय राऊत, मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या संपत्तीवर टाच एवढे प्रयत्न करूनही महाविकास आघाडीचे सरकार पडत नसल्यामुळे अडीज वर्षानंतर भाजपच्या नेत्यांनी थेट शिवसेनेत उभी फूट पडण्याची राजकीय खेळी खेळली आहे. विशेष म्हणजे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवारांना तिकिट देतानाच या फुटीची खेळी देवेंद्र फडणवीसांनी खेळली होती, असे आता स्पष्ट होऊ लागले आहे.

ठाणे आणि पालघर जिल्ह्यावर एकनाथ शिंदे यांचे एकहाती वर्चस्व आहे त्यामुळे यापरिसरात तिकीट वाटप करताना शिवसेनकडून त्यांना मुक्तहस्त देण्यात आला होता त्यामुळे या बंडात त्यांच्यासोबत माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या व्यतिरिक्त बहुतांशी सर्व आमदार सहभागी झाले आहेत. भिवंडी ग्रामीणचे शांताराम मोरे, कल्याणचे विशवनाथ भोईर,अंबरनाथचे डॉ. बालाजी किणीकर, पालघरचे श्रीनिवास वनगा हे शिंदे यांच्या आजतरी सोबत आहेत. पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी मात्र अद्याप आपली भुमीका स्पष्ट केलेली नाही. ठाणे पालघर जिल्ह्यात बहुतांशी शिवसैनिक, पदाधीकारी, नगरपालिका, महानगर पालिका, जिल्हापरिषद , जिल्हा बँक या ठिकाणी शिंदे यांनी गेल्या काही वर्षात पद्धतशीरपणे आपल्या समर्थकांची वर्णी लावून घेतली असल्याने दोन्ही जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांना मोठा पाठिंबा मिळणार हे उघड आहे.

मागील भाजप शिवसेना सरकारमध्ये सुरूवातीला एकनाथ शिंदे हे विरोधी पक्ष नेते होते, तेव्हापासूनच दवेंद्र फडणवीस आणि त्यांच्यात मधुर संबंध आहेत. २०१९ च्या कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिवसेना भाजप राज्यात सत्तेत असतानाही एकमेकांच्या विरोधात उभी ठाकली होती, भाजपच्या प्रचारासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले होते. प्रचारादरम्यान मोठी खडाजंगी झाली होती या निवडणुकीत भाजपणे मोठी ताकद लावूनही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने स्वबळावर बहुमत मिळवले होते. या निवडणुकीनंतर शिंदे यांची ताकद ओळखल्याने फडणवीस यांनी त्यांच्याबरोबरची सलगी अधिक वाढवली आणि तेव्हापासूनच शिंदे फडणवीस एकत्र आले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती.

ठाणे आणि पालघर जिल्ह्याबरोबरच गेल्या काही वर्षापासून एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या ग्रामीण भागावर विशेष लक्ष केंद्रित केले होते. ग्रामीण आमदारांना रसद पुरविण्यात येत होती त्यातही गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजप एकत्रित निवडणूक लढवली मात्र सत्तेत असताना शिवसेना कायम विरोधी भूमिका बजावत होती, पंढरपुरात झालेल्या जाहीर सभेत भाजपबरोबरच्या युतीत आमची २५ वर्षे सडली असा जाहीर घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला होता. त्यामुळे निवडणुकीत युतीत असले तरी दोन्ही पक्ष एकमेकांना संशयाने बघत होते. त्यामुळे तिकीट वाटप करतानाच एकमेकांचे आमदार पाडण्याचा राजकीय कलगीतुरा सुरु होता. भाजप स्वबळावर सत्तेत येऊ शकते असे वातावरण असतानाही काही आमदार कमी पडले आणि शिवसेना विरोधात गेली तर त्यांच्याकडील काही आमदार आपल्याकडे यावेत यासाठी आपल्याच उमेदवारांना शिवसेनेतून तिकीट देण्याची खेळी देवेंद्र फडणवीस यांनी केली होती आणि तोच डाव महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यात त्यांच्या कमी आला आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in