पाणी योजनेच्या भूमीपूजनावरून राजकारण; तळा शहरात शिवसेना शिंदेगट भाजपकडून आयोजन

तळा नगरपंचायतीची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसच्या हाती असल्याने पाणी योजनेच्या भूमीपूजनाचे आयोजन १७ फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी आपल्या मर्जीप्रमाणे करीत आहे.
पाणी योजनेच्या भूमीपूजनावरून राजकारण; तळा शहरात शिवसेना शिंदेगट भाजपकडून आयोजन

तळा : तळा शहराच्या पाणी योजनेचे भिजते घोंगडे अद्यापही कायम असून, बहुप्रतिक्षेनंतर मंजूर झालेल्या पाणी योजनेच्या भूमीपूजनावरून आता राजकारण पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. गेली कित्येक वर्षे रखडलेल्या तळा शहराच्या पाणी योजनेला एकदाची मंजुरी मिळाली.आणि ही मंजुरी आमच्या अथक परिश्रमामुळे मिळाली असल्याचे प्रत्येक पक्षाचे बॅनर तळा शहरात नाक्यानाक्यावर झळकले; मात्र आता या पाणी योजनेच्या भूमीपूजनावरून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

तळा शहराच्या पाणी योजनेचे भूमीपूजन १७ फेब्रुवारी रोजी अजित पवार यांच्या हस्ते करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही असून, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी कार्यक्रम नियोजनासाठी विश्वासात घेत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनमानी कारभाराला न जुमानता भाजप व शिवसेना शिंदेगटाने एकत्र येऊन १६ फेब्रुवारी रोजी पालकमंत्री उदय सामंत यांच्याच हस्ते तळा शहराच्या पाणी योजनेचे भूमिपूजन व्हावे यासाठी युद्धपातळीवर तयारी केली आहे.त्यामुळे तळा शहरवासीयांना मंजूर झालेल्या पाणी योजनेचे दोन वेगवेगळे भूमिपूजन पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार भूमिपूजन

तळा नगरपंचायतीची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसच्या हाती असल्याने पाणी योजनेच्या भूमीपूजनाचे आयोजन १७ फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी आपल्या मर्जीप्रमाणे करीत आहे. हे लक्षात आल्याने भाजप व शिंदेगटाने एकत्र येऊन १६ फेब्रुवारीलाच पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पाणी योजनेचा भूमिपूजन पार पडण्याचे निश्चित केले आहे. यासाठी आमंत्रण पत्रिका, बॅनर व पाट्या देखील बनविण्याचे काम या दोन्ही पक्षांकडून युद्धपातळीवर सुरू करण्यात आल्याचे खात्रीलायक वृत आहे. त्यामुळे १६ व १७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या दोन्ही भूमीपूजनाकडे तळा शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in