

ठाणे : ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्याकांडाचा तपास सीबीआय किंवा अन्य स्वतंत्र सक्षम यंत्रणेकडे सोपवावा, अशी मागणी पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांसह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी केली आहे. या प्रकरणातील सर्व संशयितांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. तसेच मारेकऱ्यांसह कटात सहभागी असल्याचा आरोप असलेल्या व्यक्तींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कारवाई करावी, अशी मागणी पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्याकडे करण्यात आली आहे.
प्रदीप पूर्णेकर यांची २९ सप्टेंबर रोजी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडामुळे ठाण्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. गुन्हे शाखेने या प्रकरणात आतापर्यंत काही संशयितांना अटक केली आहे. मात्र, तपासाची दिशा तसेच काही व्यक्तींविरोधात अद्याप कारवाई न झाल्याबाबत पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
निवेदनात मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांच्याबाबत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पूर्णेकर यांना यापूर्वी धमकी देण्यात आल्याचा दावा निवेदनात करण्यात आला असून, हत्या प्रकरणातील संशयित आरोपी आणि संबंधित राजकीय व्यक्तींमधील कथित संबंधांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. या सर्व आरोपांची निष्पक्ष चौकशी करून सत्य समोर आणावे, अशी भूमिका निवेदनकर्त्यांनी मांडली आहे. निवेदनावर स्व. प्रदीप पूर्णेकर यांचे पुत्र राम प्रदीप पूर्णेकर यांच्यासह राजन विचारे, अविनाश जाधव, मनोज प्रधान, राहुल पिंगळे, राजन राजे, केदार दिघे, रवींद्र मोरे आणि अनिश गाढवे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
ठाण्यातील गुन्हेगारीवरही सवाल
ठाणे शहरातील वाढत्या हत्यांच्या घटनांवरून कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दाही निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे. फेब्रुवारी ते सप्टेंबरदरम्यान ठाणे शहर आणि परिसरात विविध ठिकाणी झालेल्या हत्यांच्या घटनांचा संदर्भ देत गुन्हेगारांवर प्रभावी वचक निर्माण करण्याची मागणी करण्यात आली आहे. कर्तव्य बजावत असताना पोलीस उपनिरीक्षक किसन भोईर यांची हत्या झाल्याचाही निवेदनात उल्लेख आहे. गस्तीवर असलेल्या पोलिस अधिकाऱ्याची हत्या होणे ही गंभीर बाब असून, अशा घटनांमागील कारणांचा सखोल तपास करण्याची मागणी करण्यात आली आहे.
विशेष सरकारी वकिलाची नियुक्तीची मागणी
पूर्णेकर यांच्या हत्येनंतर ३ ऑक्टोबर रोजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपशहरप्रमुख संतोष शिर्के यांच्या कार्यालयात काही व्यक्तींनी राडा केल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. या घटनेची गंभीर दखल घेऊन संबंधितांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.पूर्णेकर हत्या प्रकरणाचा तपास जलदगतीने पूर्ण करून दोषींवर कठोर कारवाई करावी, खटला जलदगती न्यायालयात चालवावा तसेच विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करावी, अशी मागणी निवेदनाच्या अखेरीस करण्यात आली आहे.
पूर्णेकर हत्याकांडातील कार पोलिसांच्या ताब्यात
ठाकरे गटाचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप ऊर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्येनंतर मारेकऱ्यांनी पलायनासाठी वापरलेली अल्टो कार अखेर पोलिसांच्या हाती लागली आहे. पनवेल-कळंबोली परिसरातील एमजीएम रुग्णालयाजवळ ही कार पोलिसांनी जप्त केली. ही कार अटकेतील पप्प्या शिंदे याचा मित्र विजय पवार याची असून, गणेशोत्सवाच्या काळात पप्प्याने वापरण्यासाठी ती घेतल्याचे तपासात समोर आले आहे.हत्येच्या चार दिवस आधीच कारमध्ये सुमारे दोन हजार रुपयांचे पेट्रोल भरून ती समतानगर परिसरात उभी करण्यात आली होती. हत्येनंतर मारेकरी दुचाकीवरून समतानगर येथे पोहोचले. तेथून कार घेऊन त्यांनी पनवेलच्या दिशेने पलायन केले. कळंबोलीतील एमजीएम रुग्णालयाजवळ पेट्रोल संपल्याने कार रस्त्यावरच सोडून मारेकरी पसार झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. निखिल यादव आणि नितेश पवार यांची पोलीस कोठडी गुरुवारी (ता. ८) संपत असल्याने त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. पुढील तपासासाठी त्यांच्या कोठडीची मागणी होण्याची शक्यता आहे.