Thane : पूर्णेकर हत्याकांडावरून तणाव; एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनाचा प्रयत्न, राम पूर्णेकरांना पोलिसांनी घेतले ताब्यात

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येला २८ दिवस उलटूनही मुख्य सूत्रधाराला अटक न झाल्याने कुटुंबीय आक्रमक झाले. मुलगा राम पूर्णेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर आंदोलनाचा प्रयत्न केला असता नौपाडा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
पूर्णेकर हत्याकांडावरून तणाव; एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनाचा प्रयत्न, राम पूर्णेकरांना पोलिसांनी घेतले ताब्यात
पूर्णेकर हत्याकांडावरून तणाव; एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनाचा प्रयत्न, राम पूर्णेकरांना पोलिसांनी घेतले ताब्यात
Published on: 

ठाणे : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येला २८ दिवस उलटूनही मुख्य सूत्रधाराला अटक झालेली नसल्याचा आरोप करत पूर्णेकर कुटुंबीयांनी मंगळवारी आक्रमक भूमिका घेतली. मुलगा राम पूर्णेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, नौपाडा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेले. या कारवाईनंतर पूर्णेकर कुटुंबीयांसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली. मुख्य सूत्रधाराला अटक करण्याच्या मागणीसाठी त्यांनी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या मांडला. ‘न्याय मागणाऱ्याला ताब्यात घेता, मग आरोपींवर कारवाई का नाही?’ असा सवाल करत कुटुंबीयांनी पोलिसांच्या तपासावर अविश्वास व्यक्त केला.

प्रदीप पूर्णेकर यांची २९ सप्टेंबरच्या रात्री मानपाडा परिसरातील त्यांच्या कार्यालयात गोळ्या झाडून आणि धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात आतापर्यंत पाच आरोपींना अटक झाली आहे. मात्र, हत्येमागील नेमके कारण आणि मुख्य सूत्रधाराचा शोध अद्याप लागलेला नसल्याचा आरोप पूर्णेकर कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणात माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचे पती राजेंद्र शिंदे यांना अटक करण्याची मागणीही कुटुंबीयांनी वारंवार केली आहे. या आरोपांबाबत संबंधितांची भूमिका आणि पोलिसांच्या तपासातील निष्कर्ष अद्याप स्पष्ट होणे आवश्यक आहे.

छायाचित्र : दीपक कुरकुंडे

२४ तासांचा अल्टिमेटम

राम पूर्णेकर यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन काही पुरावे सादर केल्याचा दावा केला होता. तसेच राजेंद्र शिंदे यांना २४ तासांत अटक न केल्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार मंगळवारी सकाळी राम पूर्णेकर रिक्षाने शिंदे यांच्या निवासस्थानाकडे गेले. मात्र, आंदोलन करण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना रोखून ताब्यात घेतले आणि नौपाडा पोलीस ठाण्यात नेले.

छायाचित्र : दीपक कुरकुंडे

‘लाखोंच्या संख्येने आंदोलन करू’

प्रदीप पूर्णेकर यांचे भाऊ जयनाथ पूर्णेकर यांनी या कारवाईवर संताप व्यक्त केला. “कितीही बॅरिकेडिंग करा; सगळे समोर आल्यानंतरही आरोपींना अटक का होत नाही? यापुढे लाखोंच्या संख्येने आंदोलन करू,” असा इशारा त्यांनी दिला.

छायाचित्र : दीपक कुरकुंडे

आघाडीचे नेते पोलीस ठाण्यात

खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे, मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, काँग्रेसचे विक्रांत चव्हाण, राष्ट्रवादीचे मनोज प्रधान व पूर्णेकर कुटुंबीयांनी पोलीस ठाणे गाठून राम पूर्णेकरांच्या अटकेवर पोलिसांना धारेवर धरले. मुख्य सूत्रधाराला अटक करा, अशी भूमिका घेत ठिय्या मांडला.

गुरुवारी महाआंदोलन

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येला २७ दिवस उलटूनही मुख्य सूत्रधाराला अटक झाली नसल्याच्या निषेधार्थ गुरुवारी (२९ ऑक्टोबर) ठाण्यात सर्वपक्षीय महाआंदोलन करण्यात येणार आहे. जांभळी नाका येथील चिंतामणी चौकात सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या या आंदोलनात विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी होणार आहेत. ‘एकच ध्यास, भयमुक्त ठाणे आमचा श्वास’, ‘पूर्णेकरांना न्याय द्या’ आणि ‘पालकमंत्री एकनाथ शिंदे राजीनामा द्या’, अशा घोषणा देत आंदोलक रस्त्यावर उतरणार आहेत. भाजपचे पदाधिकाऱ्यांचाही सहभागी होतील.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in