‘बर्थडे बॉय’ला चौथ्या माळ्यावरून ढकलले; वाढदिवसाच्या पार्टीत दारूवरून वाद

वाढदिवसाच्या पार्टीत दारूवरून वाद झाल्याने तीन मित्रांनी बर्थडे बॉयलाच चौथ्या माळ्यावरून ढकलून देत त्याचा खून केल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी मृत तरुणाच्या तीन मित्रांना बेड्या ठोकल्या आहेत.
‘बर्थडे बॉय’ला चौथ्या माळ्यावरून ढकलले; वाढदिवसाच्या पार्टीत दारूवरून वाद

उल्हासनगर : वाढदिवसाच्या पार्टीत दारूवरून वाद झाल्याने तीन मित्रांनी बर्थडे बॉयलाच चौथ्या माळ्यावरून ढकलून देत त्याचा खून केल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी मृत तरुणाच्या तीन मित्रांना बेड्या ठोकल्या आहेत.

चिंचपाडा परिसरात राहणारा कार्तिक वायाळ याचा २७ जून रोजी वाढदिवस होता. त्यानिमित्त त्याने त्याचे मित्र निलेश क्षीरसागर, सागर काळे आणि धीरज यादव यांना पार्टी दिली. चिंचपाडा गावातील आर्या अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरील निलेश क्षीरसागर याच्या फ्लॅटमध्ये ही पार्टी सुरू होती; मात्र या पार्टीत दारूवरून वाद झाले. या वादात कार्तिक याने निलेशच्या डोक्यात दारूची बाटली फोडली. याचा राग आल्यामुळे निलेश, सागर आणि धीरज या तिघांनी कार्तिक याला चौथ्या मजल्यावरून थेट इमारती खाली ढकलून दिले. यात कार्तिकचा मृत्यू झाला. या घटनेनंतर कार्तिकने निलेशच्या डोक्यात बाटली मारल्याने तो जखमी झाला आणि आम्ही त्याला रुग्णालयात घेऊन गेलो, तिथून परत आल्यानंतर कार्तिक हा मृतावस्थेत इमारतीच्या खाली आढळला, असा बनाव या सर्वांनी रचला होता; मात्र कार्तिकच्या वडिलांनी या तिघांवर संशय व्यक्त केल्याने पोलिसांनी या तिघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करत त्यांना ताब्यात घेतले होते. त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी कार्तिकच्या हत्येची कबुली दिली.

याप्रकरणी या सर्वांना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी दिली आहे. वाढदिवसाच्या पार्टीतच कार्तिकची हत्या झाल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांवर मात्र दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

logo
marathi.freepressjournal.in