कर्जत नगराध्यक्षपदी पुष्पा दगडे

कर्जत नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी व इतर मित्रपक्षांच्या संयुक्त विद्यमाने स्थापन करण्यात आलेल्या कर्जत परिवर्तन विकास आघाडीने दणदणीत विजय मिळवला आहे.
कर्जत नगराध्यक्षपदी पुष्पा दगडे
Published on

विजय मांडे/कर्जत

कर्जत नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी व इतर मित्रपक्षांच्या संयुक्त विद्यमाने स्थापन करण्यात आलेल्या कर्जत परिवर्तन विकास आघाडीने दणदणीत विजय मिळवला आहे. नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार पुष्पा हरिश्चंद्र दगडे यांनी भाजपच्या उमेदवार डॉ. स्वाती अक्षय लाड यांचा ४,४७० मतांनी पराभव केला.

परिवर्तन विकास आघाडीचे एकूण १३ उमेदवार निवडून आल्याने कर्जत नगरपरिषदेत या आघाडीची निर्विवाद सत्ता प्रस्थापित झाली आहे.

निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ८, शिवसेना (उबाठा)चे ४ आणि १ अपक्ष (परिवर्तन आघाडी पुरस्कृत) उमेदवाराचा समावेश आहे. तर महायुतीकडून शिवसेना (शिंदे गट)चे ७ आणि भाजपचा १ उमेदवार निवडून आला आहे. मतमोजणीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

नगराध्यक्ष ते नगरसेवक परंपरा मोडीत

कर्जत नगरपरिषदेच्या इतिहासात एकदा नगराध्यक्ष झाल्यानंतर पुन्हा नगरसेवक म्हणून निवडून न येण्याची परंपरा होती. मात्र माजी नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी ही परंपरा मोडीत काढत १,३९७ मताधिक्याने विजय मिळवला. या निवडणुकीत महेंद्र चंदन यांनी सर्वाधिक १,०६७ मताधिक्य मिळवत विक्रम केला. तसेच कर्जत नगरपरिषद स्थापन झाल्यापासून प्रत्येक निवडणुकीत लाड आणि ओसवाल आडनावाचे नगरसेवक असायचे; मात्र यावेळी त्या आडनावाचे एकही नगरसेवक निवडून आले नाहीत.

logo
marathi.freepressjournal.in