भिवंडीतील वाहतूककोंडीला बांधकाम विभाग जबाबदार; खासदार सुरेश म्हात्रे यांचा आरोप

मागील पंधरा दिवसांपासून मुंबई-नाशिक महामार्गाबरोबरच भिवंडी-ठाणे, भिवंडी-कल्याण, भिवंडी-वाडा व मानकोली-अंजुरफाटा चिंचोटी या महामार्गांबरोबरच शहरातील अंजुरफाटा धामणकर नाका ते वंजारपट्टी नाका या रस्त्यावर प्रचंड वाहतूककोंडी होत असल्याने या सर्वच मार्गावरून प्रवास करणारे प्रवासी व स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

भिवंडी : मागील पंधरा दिवसांपासून मुंबई-नाशिक महामार्गाबरोबरच भिवंडी-ठाणे, भिवंडी-कल्याण, भिवंडी-वाडा व मानकोली-अंजुरफाटा चिंचोटी या महामार्गांबरोबरच शहरातील अंजुरफाटा धामणकर नाका ते वंजारपट्टी नाका या रस्त्यावर प्रचंड वाहतूककोंडी होत असल्याने या सर्वच मार्गावरून प्रवास करणारे प्रवासी व स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत. भिवंडीतील ही वाहतूककोंडी सोडविण्यासाठी भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा सतत दोन दिवस रस्त्यावर उतरले होते. भिवंडीत सतत होणाऱ्या या वाहतूककोंडीला सार्वजनिक बांधकाम विभागासह महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ व त्यांच्या अखत्यारित काम करणारे ठेकेदार जबाबदार आहेत, असा आरोप खासदार बाळ्या मामा यांनी केला आहे.

सोमवारी खासदार बाळ्या मामा यांच्या अध्यक्षतेखाली भिवंडीतील वाहतूककोंडी समस्येबाबत मानकोली येथील कार्यालयात झालेल्या बैठकीत बाळ्या मामा यांनी थेट अधिकारी व ठेकेदारांवर आरोप करत त्यांना चांगलेच खडेबोल सुनावले.

खारेगाव ते वडपा रस्ता रुंदीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून अधिकाऱ्यांचा कामाच्या गुणवत्तेकडे लक्ष नाही. ठेकेदार मनमर्जीने काम करत असून कामाच्या दिरंगाईने व अर्धवट कामांमुळे या महामार्गावर प्रचंड वाहतूककोंडी होत आहे.

अधिकारी नेहमी पावसाचे कारण पुढे करून वेळ मारून नेतात मात्र जेव्हा पाऊस नसतो तेव्हा संबंधित अधिकारी व कर्मचारी रस्त्याच्या कामाच्या दुरुस्ती ठिकाणी का उपस्थित नसतात, ठेकेदारांवर नियंत्रण का ठेवत नाहीत, असा सवाल यावेळी खासदार बाळ्या मामा यांना बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना केला असून, रस्त्यावर पडलेले खड्डे भरण्याच्या व रस्त्यांची अर्धवट कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी केल्या.

logo
marathi.freepressjournal.in