राजकुमार भगत/उरण : कधी काळी निव्वळ शेती आणि मासेमारी हाच प्रमुख व्यवसाय असलेला उरण तालुका हा सध्या उद्योगधंद्याचे आणि गुंतवणूकदारांचे केंद्र बनले आहे. त्यातच आत्ता उरण तालुक्याला थेट मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतूचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उद्घाटन होणार आहे. त्यामुळे एखाद्या मुंबईच्या उपनगरापेक्षा देखील जवळ उरण तालुका आला आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांत उरण तालुक्याचा मोठ्या प्रमाणात विकास होणार असून, तालुक्याचा संपूर्ण चेहरामोहरा बदलणार आहे.
जेएनपीटी, ओएनजीसी, बीपीसीएल, जीटीपीएससारख्या प्रकल्पामुळे उरण तालुक्याला सुबत्ता आली आहे. जेएनपीटी स्थापन झाल्यानंतर तर येथे उद्योगधंद्याचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे. या परिसरात हजारो नोकऱ्या आणि रोजगार निर्माण झाले आहेत. आता तर उरण थेट मुंबईला जोडला गेला असल्याने उरणला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. आज सुरू होत असलेल्या अटल सेतूवरून रोज ७० हजार वाहने धावणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे उरण तालुक्यात येणाऱ्या वाहनांची संख्या प्रचंड वाढणार आहे.
अगोदरच उरण तालुक्यात वाहतूककोंडीची समस्या खूप आहे. त्यातच आणखी ७० हजार वाहनांची भर या वाहतूकीत पडली, तर गोंधळाची परिस्थिती निर्माण होणार आहे. ज्या ठिकाणी चिर्ले इंटरचेंजजवळ हा पूल संपतो, त्या भागात तर अनधिकृत पार्किंगमुळे वाहतूककोंडी आणि अपघात ठरलेले आहेत. या इंटरचेंजजवळ शेकडो अनधिकृत गोदामे, कॅन्टीन, भंगारवाले, धाबे यांनी आपले बस्तान थाटले आहे. यामुळे येथील सर्व्हिस रोडवर नेहमी या वाहनांची पार्किंग असते. चिर्ले इंटरचेंजवरून गोव्याला किंवा कोकणात जाणाऱ्या वाहनांसाठी एनएच ३४८ वरून पळस्पे मार्गे खारपाडापर्यंत येण्यासाठी ४१ कि.मी. अंतर पार करावे लागते. तर चिर्ले इंटरचेंजवरून चिरनेरमार्गे तेच अंतर २५ कि.मी. होते. त्यामुळे या मार्गे कोकणात जाणाऱ्यांसाठी वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे; मात्र याच मार्गावर सर्व्हिस रोडवरच्या अनधिकृत पार्किंगमुळे आणि अवजड वाहनांच्या बेशिस्त वाहतुकीमुळे नेहमी वाहतूककोंडी होते. अटल सेतूवरून येणाऱ्या वाहनांची या वाहतुकीत भर पडल्यास या वाहनचालकांना आगीतून फुफाट्यात पडल्यासारखे होणार आहे.
एकेकाळी फक्त शेतीप्रधान असलेल्या या तालुक्याची ओळख आता उद्योग क्षेत्रात आघाडीवर असलेला तालुका म्हणून झाली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे उरण तालुक्यालगतच असल्यामुळे येथे त्या अनुषंगाने देखील विकास होणार आहे. न्हावा-शिवडी सिलिंक, उरण-नेरूळ रेल्वे, मल्टीमॉडेल कॉरिडॉर व तालुक्यातील दोन्ही राष्ट्रीय मार्गांचे रुंदीकरण यामुळे दळणवळणाच्या व वाहततुकीच्या सुविधा वाढणार आहेत. त्यामुळे येथील दळणवळण अधिक जलद होणार आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, न्हावा-शिवडी सी-लिंक, उरण-नेरूळ लोकल, जेएनपीटी सेझ, करंजा मच्छिमार बंदर, एमएमआरडीएचा मल्टी मॉडल कॉरिडॉर सारख्या प्रकल्पामुळे उरण तालुका हा विकासाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. येथे भविष्यात होणारा विकास ओळखून सिडकोने, म्हाडाने देखील या भागात मोठ्या प्रमाणात निवासी संकुले उभारण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या परिसरात लोकसंख्या देखील प्रचंड वाढणार आहे.
उरण तालुक्यातील पश्चिम भागातील शेती संपुर्ण संपादित करण्यात आली आहे. तेथे खासगी जमीन शिल्लक नसल्याने विकासकांचा डोळा सध्या पुर्व भागातील जमिनीवर आहे. अनेक धनाढ्यांनी या परिसरात कवडीमोल दराने येथील शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या आहेत. आता तर आणखी जमीन आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी हे धनाढ्य व्यावसायिक धडपडत आहेत. या धनाढ्यांचे एजंट सध्या या जमिनी बळकावण्यासाठी शेतकऱ्यांच्या घरी हेलपाटे घालताना दिसत आहेत.
येणारा काळ उरणकरांसाठी आशेचा किरण
उद्योगांपासून काहीसा मागास राहिलेल्या उरण पूर्व भागात देखील आता विकास होऊ लागला आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांत उरण तालुक्याचा पूर्ण चेहरामोहराच बदलला जाणार आहे. येथील स्थानिकांनी सावध राहणे गरजेचे असून, बदलणाऱ्या या प्रवाहात आपले अस्तित्व टिकविणे गरजेचे आहे. नवी मुंबईतील स्थानिकांची जशी परिस्थिती आता आहे, त्याचा बोध घेणे गरजेचे आहे. त्यामुळे येणारा काळ हा उरणकरांसाठी आशेचा किरण असला तरी त्यामध्ये आपले प्रतिबिंब निर्माण करण्याची गरज आहे.