ठाणे : ठाणे ते कळवा रेल्वे स्थानक दरम्यान प्रवास करणाऱ्या जगन जंगले (३१) या तरुणाला फटका गँगमुळे दोन्ही पाय गमवावे लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने तीव्र संताप व्यक्त होत असून फटका गँगचा बंदोबस्त करावा, अशी मागणी रेल्वे प्रवाशांनी केली आहे.
दादरमधील मॅजेस्टिक बुक स्टॉल येथे कामाला असलेले जगन हे कल्याण येथे राहतात. तीन महिन्या पूर्वीच जगन यांचे लग्न झाले. जगन यांनी २२ मे रोजी कल्याणला जाणारी लोकल रात्री दादर स्थानकातून पकडली. कळवा-ठाणे रेल्वे स्थानकादरम्यान लोकल आल्यानंतर दरवाजात उभे असलेल्या जगन यांच्या हातातील मोबाइल हिसकावण्यासाठी एका गर्दुल्ल्याने त्यांच्या डाव्या हातावर दांडक्याने फटका मारला. यात तोल गेल्याने जगन हे फलाट क्रमांक दोनपासून २०० मीटर पुढे लोकलमधून खाली पडले. त्याचवेळी त्यांचा मोबाईलही गहाळ झाला. या घटनेमध्ये जगन यांच्या दोन्ही पायांवरून लोकलचे चाक गेल्यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले होते. मात्र पायावर तातडीने शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याने त्यांना ठाण्यातील ढोकाळी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याठिकाणी त्यांचे दोन्ही पाय कापावे लागले. या प्रकरणी ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, जगन हे नेमके कसे पडले, त्यांना कोणी पाडले, त्यांचा मोबाईल कोणी हिसकावला? या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येत असल्याची प्राथमिक माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.
आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाचा जीव वाचवणे सर्वात महत्त्वाचे असते. हा रुग्ण आमच्याकडे आला तेव्हा मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. त्याला ४ बाटल्या रक्त चढविण्यात आले. त्यानंतर आमची टीम त्याची प्रकृती नियंत्रणात आणण्यासाठी रात्रभर प्रयत्न करत होती. त्याचे दोन्ही पाय कापावे लागले असून यापुढे त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. यासाठी मोठा खर्च येणार आहे.
- डॉ. बाबासाहेब चव्हाण, ( अस्थिरोग तज्ज्ञ, हायलँड हॉस्पिटल )
मी कधीच उभा राहू शकत नाही
माझ्या हातावर काठीचा फटका पडला आणि मी लोकलमधून खाली पडलो. माझ्यासोबत काय घडले आहे ते काही काळ मला समजलेच नाही. मी वाचवा वाचवा ओरडत होतो, लोक मदतीला आले आणि मला रुग्णालयात दाखल केले. पायावरून लोकल गेली आणि दोन्ही पाय गमावल्याचे डॉक्टरांनी मला सांगितलं. यापुढे मी कधीच उभा राहू शकत नाही, अशी खंत जगन जंगले यांनी व्यक्त केली.