
अंबरनाथ : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अंबरनाथ शहरातील पदाधिकाऱ्यांना कठोर सूचना देत मतदार याद्यांवर काटेकोर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले. मतदार आपल्याला मतदान करतात, मात्र ही मतं चोरीला जातात. निवडणुकीत गाफील राहू नका, मतदार याद्यांचा अभ्यास करा. प्रत्येक यादीवर दोन बीएलओ नेमा आणि गटअध्यक्षांना याद्यांची जबाबदारी वाटून द्या, असे आदेश त्यांनी दिले.
शुक्रवारी अंबरनाथ पूर्वेतील पनवेलकर हॉल येथे आयोजित बैठकीत राज ठाकरे यांनी मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. या बैठकीस माध्यमांना प्रवेश नाकारण्यात आला होता. अलीकडेच अंबरनाथमधील तीन माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने स्थानिक पातळीवर मनसेला धक्का बसल्याच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या या दौऱ्याला विशेष महत्त्व होते.
तथापि, त्यांनी युती किंवा माजी नगरसेवकांच्या पक्षत्यागाबद्दल कोणतीही थेट प्रतिक्रिया दिली नाही. बैठकीला माजी आमदार राजू पाटील, जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, अंबरनाथ शहराध्यक्ष शैलेश शिर्के यांच्यासह मोठ्या संख्येने मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.
अंबरनाथ शहर कार्यकारिणीत नवे चेहरे
यावेळी अंबरनाथ शहर कार्यकारिणी जाहीर करत अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. शहर संघटक, उपशहर अध्यक्ष, विभाग अध्यक्ष, उपविभाग अध्यक्ष व शाखा अध्यक्ष अशा पदांसाठी नवीन नियुक्त्या करण्यात आल्या. शहरातील पक्षाची ताकद वाढवण्यासाठी ही पुनर्रचना करण्यात आल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.