

ठाणे : ठाणे शहराचा विकास महत्त्वाचा आहेच, पण त्याआधी ठाण्याचा स्वाभिमान आणि मराठी ठसा टिकवणे हेच खरे उद्दिष्ट असले पाहिजे. ठाणे हे केवळ महानगरपालिका किंवा निवडणुकीपुरते शहर नाही, तर मराठी अस्मितेचा, स्वाभिमानाचा आणि संघर्षाचा इतिहास असलेले शहर आहे. आज या मुंबई, ठाण्यासह आजूबाजूच्या शहरांच्या मराठी अस्तित्वावरच घाला घालण्याचे कारस्थान सुरू असून गाफील राहाल तर फसाल, असा गर्भित इशारा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ठाण्यातील जाहीरसभेत बोलताना दिला.
ठाण्यात गडकरी रंगायतनशेजारी आयोजित करण्यात आलेल्या जाहीरसभेत ते बोलत होते. पैशांच्या जोरावर मते विकत घेण्याचा प्रयत्न होत आहे आणि तुम्हीसुद्धा ५ - ५ हजारांना विकले जात आहात, उद्या तुमच्या मुलांना तुम्ही काय सांगणार आहात? याचा विचार करा, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.
भाजपचे नेते अण्णामलाई यांनी मुंबईबद्दल केलेले विधान आणि त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया यांचा व्हिडीओ राज ठाकरे यांनी ठाण्यातील सभेत दाखवला. मला असे वाटत होते की फडणवीस यांना इंग्रजी कळते. पण ते किती खोटं बोलतात. त्याला काही मर्यादा आहे की नाही, असा सवाल राज ठाकरे यांनी सभेतून विचारला.
भाजपवाले मतांसाठी पैसे वाटत आहेत आणि शिंदेची लोक त्यांना पकडतात. एवढा पैसा यांच्याकडे येतो कुठून? निवडणूक शेवटच्या टप्प्यात असून उद्यापासून उघडपणे पैसे वाटप सुरू होईल, असा दावा करत त्यांनी भाजप आणि शिंदे सेनेवर हल्लाबोल केला. घराघरांत पाच हजार रुपये वाटले जात आहेत. जर विकास केला असेल तर पैसे वाटण्याची गरज का भासते? असा सवालही त्यांनी केला.
उमेदवारांना कोट्यवधींची ऑफर
कल्याण-डोंबिवली परिसरात पैशांच्या जोरावर उमेदवारी मागे घ्यायला लावली जात असल्याची टीका करत त्यांनी, येथे गुलामांचा बाजार मांडला जात असल्याची टीका केली. कल्याण-डोंबिवलीमधील शैलेश धात्रक, मनीषा धात्रक यांना १५ कोटींची ऑफर दिली गेली. ठाण्यात राजेश्री नाईक यांना ५ कोटी आणि सुशील आवटे यांना १ कोटींची अशा पध्दतीने अनेक उमेदवारांना कोट्यवधी रुपयांच्या ऑफर देण्यात आल्या असून काहींनी त्या नाकारत स्वाभिमान जपला, हे राज्यासाठी आशादायक असल्याचे त्यांनी सांगितले.
बदलापूर प्रकरण बाहेर काढले म्हणून त्याला ठार मारले. या नराधमांना ठार मारलेच पाहिजे, पण एन्काऊंटरमध्ये का मारले, त्याच्याकडून काही गुपित उघड होणार होते का, असा सवाल उपस्थित करत या प्रकरणातील सहआरोपीला स्वीकृत नगरसेवकपद देण्याची हिंमत का होते, कारण तुम्हाला गृहीत धरले जात आहे. ५ हजार फेकले की तुम्ही विकले जाता, अशा शब्दात त्यांनी मतदारांचीही कानउघाडणी केली.
राज ठाकरे यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवरही गंभीर प्रश्न उपस्थित केले. सोलापूरमध्ये आमच्या कार्यकर्त्यांचा खून होतो. पोलीस हतबल दिसतात. हे कोणते राज्य आहे? असा सवाल करत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निष्क्रियतेचा आरोप केला. कोर्ट, पोलीस यांच्याकडे तक्रार करूनही उपयोग होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
मोठ्या उद्योगसमूहांना झुकते माप दिले जात असून विमानतळ, बंदरे, वीज यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांत मक्तेदारी निर्माण होत असून, भविष्यात देश आणि राज्याचे भवितव्य काही मोजक्या लोकांच्या हातात जाण्याचा धोका असल्याचे त्यांनी सांगितले. ‘मी उद्योगपतींच्या विरोधात नाही, पण एकाच व्यक्तीवर एवढी मेहरबानी का?’ असा सवाल त्यांनी केला.मुंबई आणि ठाण्याच्या मराठी अस्मितेवर घाला घालण्याचा प्रयत्न होत आहे. मुंबई महाराष्ट्राला मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला. आता मराठी ठसा पुसण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुंबई मिळवता येत नाही म्हणून हे आजूबाजूची शहरे गुजरातला जोडण्याचा घाट घालत आहेत. त्यानंतर मुंबईवर घाला घातला जाणार आहे. त्यामुळे आताच सावध व्हा, असेही ते म्हणाले.