आमदार राजन साळवींची ठाणे एसीबीत दीड तास चौकशी; म्हणाले - "मी शिवसेनाप्रमुखांचा सैनिक, विनाकारण छळणाऱ्यांना..."

आमच्या मालमत्तेचा हिशोब आम्ही दिलेला असून कुटुंब म्हणून आम्ही उद्धव ठाकरेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, असे दुर्गेश साळवी यांनी सांगितले.
आमदार राजन साळवींची ठाणे एसीबीत दीड तास चौकशी; म्हणाले - "मी शिवसेनाप्रमुखांचा सैनिक, विनाकारण छळणाऱ्यांना..."

ठाणे : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते, आमदार राजन साळवी आणि पुतणे दुर्गेश साळवी यांना मंगळवारी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशीसाठी बोलावले होते. याप्रकरणी तब्बल दीड तास दोघांची चौकशी करण्यात आली. मी शिवसेनाप्रमुखांचा सैनिक असून अखेरच्या श्वासापर्यंत ठाकरेंसोबतच राहणार असल्याचा विश्वास साळवी यांनी व्यक्त केला. तसेच माझ्या कुटुंबीयांना विनाकारण छळणाऱ्यांना नियती नक्कीच धडा शिकवेल, असा इशारा देखील साळवी यांनी सरकारला दिला.

गेली दीड वर्षे शिवसेना आमदार राजन साळवी यांची एसीबीमार्फत चौकशी सुरू आहे. रत्नागिरी, अलिबाग आणि त्यांनतर आता ठाणे एसीबी कार्यालयाकडून साळवी यांना चौकशीसाठी बोलाविण्यात आले आहे. देशातील केंद्रीय यंत्रणा उद्धव ठाकरे यांच्याबरोबर जेजे आहेत, त्यांना अशा प्रकारे अडकविण्यात येत असल्याचा आरोप यावेळी साळवे यांनी केला. तसेच जी काही आमची मालमत्ता आहे, त्याचा हिशोब मागवण्यात आला होता, तो आम्ही दिलेला असून भविष्यात हवे ते सहकार्य करू, असेही साळवी यांनी सांगितले. माझ्यावर जर कोणाचा राग असेल तर हवी ती कारवाई करू शकता. मात्र कुटुंबाला त्रास देण हे काही योग्य नाही. तसेच शिवसेनाप्रमुख आणि कोकणाचे वेगळे नाते असून विरोधकांना भीक घालणार नाही, असा थेट इशारा साळवी यांनी दिला. राजन साळवी यांचा मी पुतण्या असल्याने मलाही चौकशीला बोलावण्यात आले. या चौकशीत काही निष्पन्न होणार नाही. आमच्या मालमत्तेचा हिशोब आम्ही दिलेला असून कुटुंब म्हणून आम्ही उद्धव ठाकरेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, असे दुर्गेश साळवी यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in