फोटोप्रमाणे गणेश मूर्ती बनवण्यात रामभाऊंचा हातखंडा

मूर्ती घडविण्यासाठी लागणारी शाडूची माती, रंग हे बाहेरगावावरुन आणावे लागत असून यांच्या किमतीत ३५ ते ४० टक्क्यांनी वाढ झाली
फोटोप्रमाणे गणेश मूर्ती बनवण्यात रामभाऊंचा हातखंडा

गणेशोत्सवाला काही दिवसाचा कालावधी शिल्लक राहिल्याने खर्डीत गणेश मूर्ती घडविणाऱ्या कारागीरांची धावपळ उडाली असून, शाडूच्या व प्लास्टर ऑफ पॅरीसच्या गणेशमूर्ती बनविण्यासाठी खर्डी विभागातील दळखण येथील प्रसिद्ध मूर्तिकार रामभाऊ जाधव यांचे परिवार मग्न झाले असून,फोटोप्रमाणे गणेश मूर्ती बनवून देण्यात त्यांचा हातखंडा असल्याने गणेशमूर्ती बूक करण्यासाठी त्यांच्याकडे मुंबई, नाशिक, पालघर, ठाणे या परिसरातून गणेशभक्तांची रीघ लागत असते. प्रदूषण होऊ नये म्हणून मातीपासूनही मूर्ती बनविण्याचा त्यांचा हातखंडा आहे.

गेल्या ३५ वर्षांपासून दळखण येथील रामभाऊ जाधव, त्यांची मुले अर्जुन आणि सत्यविजय जाधव पारंपरिक पद्धतीने मूर्तिकलेचे बीज जोपासत असून सातत्याने वाढत्या महागाईतही गणेशमूर्ती बनविण्याचे काम करीत आहे. मूर्ती घडविण्यासाठी लागणारी शाडूची माती, रंग हे बाहेरगावावरुन आणावे लागत असून यांच्या किमतीत ३५ ते ४० टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे रामभाऊ जाधव यानी सांगितले. मुंबईतील मंत्रालयाजवळ असणाऱ्या आमदार निवासावरील राजमुद्रा असलेले चिन्ह रामभाऊ जाधव यांनी बनवले आहे.

खर्डीतील गणेश मूर्तीना ठाणे, कल्याण, वाशिंद, नाशिक आणि डोंबिवली येथून मोठ्या प्रमाणात मागणी असते. पारंपारिक मूर्तिकलेचा वसा जतन करण्यासाठी वाढत्या महागाईतही आपली कला आपल्या वारसानी पुढे चालवावी व गणपती बाप्पाची सेवा करावी अशी आपली इच्छा असल्याने हा व्यवसाय सुरू ठेवला असल्याचे सांगून शासनाने मूर्तिकारांना मदत करण्याची गरज असल्याचे रामभाऊ जाधव यांनी सांगितले. या कारखान्याच्या आधारावर ते गेल्या ३५ वर्षापासून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवतात.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in