
पेण शहरातील रामवाडी येथील बेकरीमध्ये बनविण्यात आलेल्या पावामध्ये चक्क उंदराची विष्ठा आढळून आल्याची घटना पेण येथे घडली आहे.
पेण येथील पत्रकार अरविंद गुरव हे एका हॉटेलमध्ये सकाळी नाष्टा करण्यासाठी गेले असता तेथील पावामध्ये त्यांना उंदराची विष्टा आढळून आल्याने त्यांनी याबाबत हॉटेल मालकाकडे जाऊन विचारणा केली असता, हॉटेल मालकाने पाव रामवाडी येथील एका बेकरीतून आल्याचे सांगितले. विशेष म्हणजे हॉटेल मालकाकडे बेकरिवाल्याचा संपर्क क्रमांक नव्हता. यामुळे अरविंद गुरव यांनी तात्काळ अन्न आणि औषधे प्रशासनाचे अधिकारी लक्ष्मण दराडे यांच्याशी संपर्क केला, आणि घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगितला.
मात्र यावर दराडे यांनी आमच्याकडे निरीक्षक रजेवर असल्याने येत्या सोमवारी आम्ही पाहाणी करून बेकऱ्यांवर कारवाई करू असे उत्तर दिले. गुरव तसेच पेणमधील पत्रकार किरण बंधनकर आणि प्रशांत पोतदार यांनी रामवाडी येथील बेकरी मध्ये जाण्याचे ठरवल्यानंतर रामवाडी येथील ५ बेकऱ्यांना त्यांनी भेट दिली असता धक्कादायक वास्तव समोर आले.
रामवाडी येथील पाचही बेकरीमध्ये अत्यंत किळसवाण्या पद्धतीने पदार्थ बनवित असल्याचे दिसून आले. येथे कोणत्याही प्रकारची स्वच्छता ठेवण्यात आली नव्हती. तसेच पदार्थ बनविण्यासाठी अत्यंत घाणेरड्या आणि दर्जा नसलेले सामान येथील कामगार आणि व्यापारी वापरत असल्याचे समोर आले.
या बेकरीमध्ये उंदीर, घुशी, पाली, मुंग्या-कीडे आणि कुत्रे असे अनेक प्राण्यांचा यथेच्छ वावर या बेकरीमध्ये होताना दिसून आला. विशेष बाब म्हणजे या बेकऱ्यांमधूनच पूर्ण पेण शहराला बेकरी पदार्थांचा पुरवठा होत असतो. त्यामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या बेकरी मालकावर कडक कारवाई व्हावी यासाठी पत्रकार अरविंद गुरव, किरण बांधनकर आणि प्रशांत पोतदार यांनी तात्काळ अन्न आणि औषधे प्रशासनाचे अधिकारी दराडे यांची भेट घेऊन त्यांना लेखी तक्रार दिल्यानंतर घटनास्थळी येण्याची विनंती केली.
अन्न आणि औषध प्रशासन अधिकारी लक्ष्मण दराडे यांनी या बेकऱ्यांची पाहणी केली असता त्यांना ही धक्का बसला. यावेळी दराडे यांनी बेकरीच्या परवान्याची तपासणी करून बेकरीच्या बांधकामामध्ये सुधारणा करण्याचे निर्देश दिले तसेच स्वच्छता राखण्याचे ही आवाहन केले आहे.
उत्पादन बंद ठेवण्याचे निर्देश
अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी बेकरीची पाहणी केली असता त्यांना उंदरांनी कुरतडलेले पाव, काही पावाच्या लाद्यावर आळी पडलेल्या, याचबरोबर बेकरीत काही ठिकाणी उंदराच्या लेंड्या पडलेल्या आढळून आल्या. तसेच काही प्रमाणात कुत्र्यांचा वावर आढळून आला. यावेळी अमन स्टार बेकरी आणि विशाल बेकरी यांना उत्पादन थांबविण्याचे आदेश देऊन बेकरीमध्ये तात्काळ दुरूस्ती करण्याच्या सुचना देण्यात आल्या. तसेच येत्या सोमवारी सर्व बेकरींचे ऑडिट करून बेकरीमध्ये तयार होणाऱ्या पदार्थांचे नमूने पाहणीसाठी पाठवले जाणार असल्याचे देखिल अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.