Thane : कुख्यात गुंड रवी पुजारी अटकेत, १० दिवस पोलीस कोठडी

ठाण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाकडे १० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी कुख्यात गुंड रवीप्रकाश उर्फ रवी सुल्या पुजारी (५७) याला ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने बेंगळुरू पोलिसांकडून ताब्यात घेऊन अटक केली.
Thane : कुख्यात गुंड रवी पुजारी अटकेत, १० दिवस पोलीस कोठडी
Thane : कुख्यात गुंड रवी पुजारी अटकेत, १० दिवस पोलीस कोठडी
Published on

ठाणे : ठाण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाकडे १० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी कुख्यात गुंड रवीप्रकाश उर्फ रवी सुल्या पुजारी (५७) याला ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने बेंगळुरू पोलिसांकडून ताब्यात घेऊन अटक केली. बुधवारी दुपारी त्याला ठाणे मोक्का न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने १० दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

पुजारी हा बेंगळुरू येथील कारागृहात असल्याने त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे पथक बंगळुरू येथे गेले होते. ठाण्यातील कासारवडवली पोलीस ठाण्यात २०१७ मध्ये भारतीय दंड संहितेच्या कलम ३८५, ३८७, १२० (ब), ३४ तसेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) १९९९ च्या कलम 3(l)(ii) ३(२), ३(४) अंतर्गत गुन्हा दाखल असून हा खटला विशेष मोक्का न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. तपासात रवी पुजारी हा 'पाहिजे' आरोपी असल्याचे निष्पन्न झाले होते. २०१७ मध्ये त्याने एका बांधकाम व्यावसायिकाकडे १० कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. खंडणी न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी देत त्याच्या कार्यालयावर गोळीबार करण्यासाठी हस्तक पाठविल्याचेही समोर आले आहे. त्याच्याविरुध्द विविध पोलीस ठाण्यात सुमारे गंभीर स्वरूपाच्या ४४ गुन्ह्यांची नोंद आहे.

मूळचा कर्नाटक राज्यातील उडुपी येथील असलेला पुजारी अनेक वर्षे परदेशातून आपली गुन्हेगारी टोळी चालवत होता. त्याच्याविरुद्ध देशभरात सुमारे ४४ गंभीर गुन्हे दाखल असून त्याला पकडण्यासाठी 'रेड कॉर्नर नोटीस' ही जारी करण्यात आली होती. २०१९ मध्ये त्याला पश्चिम आफ्रिकेतील रिपब्लिक ऑफ सेनेगल देशातून अटक करण्यात आली होती. यानंतर प्रत्यार्पण प्रक्रियेनंतर त्याला भारतात आणण्यात आले होते. ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कापडणीस यांच्या पथकाने १७ मार्च २०२६ रोजी बंगळुरू (कर्नाटक) येथील पॅरॉपन्ना, अग्रहार मध्यवर्ती कारागृहातून पुजारीला ताब्यात घेऊन या गुन्ह्यात अटक केली. ठाणे विशेष मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश एस. एस. शिंदे यांच्या न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला येत्या २७मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. सरकारी पक्षाकडून विशेष सरकारी वकील संजय मोरे यांनी कामकाज पाहिले. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त विनय घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

logo
marathi.freepressjournal.in