ठाणे परिवहनच्या ताफ्यात ४८६ कंत्राटी वाहकांची भरती; कंत्राटदारासाठी ३७ कोटी ८९ लाख मोजणार

केंद्र, तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून ठाणे परिवहनच्या ताफ्यात मोठ्या प्रमाणात बसेस दाखल होत असून, यामध्ये इलेक्ट्रिक बसेस सोबतच एसी बसेसचा देखील समावेश आहे. सध्या परिवहनच्या ताफ्यात ४२४ पेक्षा अधिक बसेस असून, प्रत्यक्षात रस्त्यावर मात्र ३६० बसेस सुरू आहेत.
ठाणे परिवहनच्या ताफ्यात ४८६ कंत्राटी वाहकांची भरती; कंत्राटदारासाठी ३७ कोटी ८९ लाख मोजणार

ठाणे : ठाणे परिवहनच्या ताफ्यात दिवसेंदिवस बसेसची संख्या वाढत असली तरी, या बसेसचे संचलन करण्यासाठी आवश्यक असलेल्या वाहकांची संख्या मात्र अपुरी असल्याने कंत्राटी पद्धतीने वाहक घेण्याचा निर्णय परिवहन प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. एकाच कंत्राटदाराकडून ४८६ कंत्राटी वाहक घेण्यात येणार असून, तीन वर्षांकरिता यासाठी संबंधित कंत्राटदाराला ३७ कोटी ८९ लाख रुपये मोजावे लागणार आहेत. टप्प्या टप्प्याने हे कंत्राटी वाहक परिवहनमध्ये दाखल होणार असल्याची माहिती परिवहन प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

केंद्र, तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून ठाणे परिवहनच्या ताफ्यात मोठ्या प्रमाणात बसेस दाखल होत असून, यामध्ये इलेक्ट्रिक बसेस सोबतच एसी बसेसचा देखील समावेश आहे. सध्या परिवहनच्या ताफ्यात ४२४ पेक्षा अधिक बसेस असून, प्रत्यक्षात रस्त्यावर मात्र ३६० बसेस सुरू आहेत. काही बसेस तांत्रिक कारणांमुळे रस्त्यावर आणता येत नसून, याचे महत्वाचे कारण म्हणजे या बसेससाठी वाहकांची असलेली कमी संख्या परिवहनमध्ये जवळपास १५० ते २०० वाचकांची संख्या कमी आहे. हे वाहक जर भरण्यात आले, तर ६५ ते ७० बसेस आणखी रस्त्यावर चालवणे शक्य होणार असल्याचा दावा परिवहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे.

या बसेसच्या संचलनासाठी आता ४८६ कंत्राटी वाहक घेतले जाणार असून, हे सर्व वाहक एकाच कंत्राटदाराकडून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी परिवहन प्रशासनाकडून निविदा मागवण्यात आली होती. या निविदेनुसार मे.जी.ए. डिजीटल, वेव वर्ड प्रा.लि. गोरेगाव मुंबई ६५ या कंत्राटदाराची निवड करण्यात आली असून, या कंत्राटदाराच्या माध्यमातून टप्प्याटप्याने ४८६ वाहक परिवहनमध्ये दाखल होणार आहेत. पहिल्या टप्प्यात २५ वाहक येणार असून, त्यांचे प्रशिक्षण देखील घेण्यात येणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात ३७ वाहक दाखल होणार आहे. त्यांचेही प्रशिक्षण लवकरच होणार असल्याची माहिती परिवहन प्रशासनाने दिली आहे.

मुंबईतील मे.जी.ए.डिजीटल कंपनीला कंत्राट

प्राप्त झालेल्या निविदेनुसार मे.जी.ए. डिजीटल, वेब वर्ड प्रा. लि. गोरेगाव मुंबई, यांनी प्रतिकर्मचारी दिलेला मासिक दर हा मा. कामगार आयुक्त यांच्या कार्यालयाकडील सद्यस्थितीत लागू केलेले विशेष भत्त्याचे प्रचलित दराप्रमाणे आहे. मे.जी.ए.डिजीटल, वेब वर्ड प्रा.लि. गोरेगाव, मुंबई यांनी निविदेमध्ये ४८६ कंत्राटी वाहकांसाठी किमान वेतनानुसार मासिक खर्च नफ्यासह दिलेला असल्याने तो स्वीकारण्यात आला आहे. निविदेत व वाटाघाटी नंतर सादर केलेले दर स्वीकारण्यात आले. तीन वर्षाकरीला ३७,८९,२८,३६८ खर्चाला मान्यता देण्यात आली आहे. या वाहक भरतीमुळे परिवहनच्या ताफ्यातील गाड्या अधिक प्रमाणात बाहेर पडणार असल्याने परिवहनच्या प्रवाशांना यामुळे दिलासा मिळणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in