घोडबंदर रोडवरील १६५ झाडांची लोखंडी पिंजऱ्यातून सुटका

उच्च न्यायालयाच्या आदेशांनंतर शहरातील वृक्षांची सिमेंट काँक्रीटच्या विळख्यातून मुक्तता करण्यात येत असताना लोखंडी पिंजऱ्यात अडकलेल्या झाडांकडे पालिकेने मोर्चा वळवला आहे.
घोडबंदर रोडवरील १६५ झाडांची लोखंडी पिंजऱ्यातून सुटका

ठाणे : उच्च न्यायालयाच्या आदेशांनंतर शहरातील वृक्षांची सिमेंट काँक्रीटच्या विळख्यातून मुक्तता करण्यात येत असताना लोखंडी पिंजऱ्यात अडकलेल्या झाडांकडे पालिकेने मोर्चा वळवला आहे. पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाने सुरू केलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत घोडबंदर रोडवरील १६५ झाडांची लोखंडी पिंजऱ्यातून सुटका केली आहे. महापालिका क्षेत्रातील झाडांभोवती असलेली लोखंडी कुंपणे, जाळ्या काढण्याचे काम सातत्याने सुरू आहे. या अंतर्गत माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रात विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून झाडांसभोवती असलेले लोखंडी पिंजरे (ट्री गार्ड) कटरच्या सहाय्याने झाडांना कोणतीही इजा न होऊ देता काढण्यात आले.

रस्त्याच्या बाजूला झाडे लावताना ती झाडे कोणी तोडू नये, झाडांचे व्यवस्थित संगोपन व्हावे या हेतून झाडांच्या भोवती लोखंडी पिंजऱ्याची जाळी लावून त्यांना सुरक्षित ठेवले जाते. पण,जसजसे झाड मोठे होत जाते, तसतसे ते त्या लोखंडी पिंजऱ्यात जखडून जाते. अशा झाडांना आता मोकळा श्वास घेतला आहे. यासाठी आता ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने पुढाकार घेतला आहे.

९ हजार झाडे काँक्रीटमुक्त

याआधी शहरात सिमेंट काँक्रीटच्या विळख्यात अडककेल्या झाडांचे देखील सर्वेक्षण करण्यात आले असून ९०१८ इतकी झाडे सिमेंट काँक्रीटच्या विळख्यात असल्याचे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाच्या सर्वेक्षणात समोर आले होते. दरम्यान या झाडांच्या मुक्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने मोहीम हाती घेऊन सुमारे ९ हजार झाडे काँक्रीटमुक्त करण्यात आली आहेत. त्यानंतर वृक्ष प्राधिकरणाने घोडबंदर येथे सर्वे करून लोखंडी पिंजऱ्यात अडकलेल्या झाडांना लक्ष केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in