उल्हासनगरातील गारमेंट फॅक्टरीतून बालकामगारांची सुटका

या बालकांना पुनर्वसनासाठी बालगृहात ठेवले असून त्यांना लवकरच बालकल्याण समिती समोर सादर केले जाईल.
उल्हासनगरातील गारमेंट फॅक्टरीतून बालकामगारांची सुटका

उल्हासनगर : उल्हासनगर शहरामध्ये कॅम्प नंबर ५ परिसरातील गायकवाड पाडा येथील एका जीन्स गारमेंट फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या आठ बालकामगारांची अवघ्या एका तासात मुक्तता करण्यात आली.

सेवा संस्था ठाणे व कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फाऊंडेशन, न्यू दिल्ली जिल्ह्यात बालविवाह, बाल- कामगार, बाल-तस्करी, बाल-लैगिक शोषण थांबवण्यासाठी कार्यरत आहे. सेवा संस्थेच्या 'एक्सेस टू जस्टीस फॉर चिल्ड्रन' या प्रकल्पाचा एक भाग म्हणून सेवा संस्था, ठाणे यांच्यावतीने बालकामगार व बालतस्करी विरोधी विशेष अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत दि.२८ डिसेंबर २०२३ रोजी केलेल्या कारवाईमध्ये उल्हासनगर शहरातील कॅम्प नंबर ५ परिसरामधील गायकवाड पाडा येथील एका जीन्स गारमेंट फॅक्टरीत धाड टाकण्यात आली. धाडीत १३ ते १७ वयोगटातील एकूण ८ बालकामगार आढळून आले असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यातील सात बालके उत्तर प्रदेशातील आहेत व १ बालक हा नेपाळचा आहे, ही बालके तेथे शिलाई व हेल्पर म्हणून काम करताना आढळून आली.

या बालकांना पुनर्वसनासाठी बालगृहात ठेवले असून त्यांना लवकरच बालकल्याण समिती समोर सादर केले जाईल. या बालकामगारांची बचाव आणि सुटका करण्यासाठी मोहीम हातात घेण्याआधी सेवा संस्थेने ठाणे जिल्ह्यातील विविध भागात सर्वेक्षण केले आणि त्यात उल्हासनगर येथे काही बालकामगार आढळून आले होते. यानंतर सेवा संस्था, ठाणे यांच्याकडून महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांशी समन्वय साधून तातडीने या रेस्क्यू ऑपरेशनची आखणी केली.

सदर मोहीम कामगार विभाग कल्याण येथील जीवन जाधव (सहकारी कामगार अधिकारी), रोकडे (दुकाने व आस्थापना निरीक्षक), विशेष बाल पोलीस पथक ठाणे येथील हिललाईन पोलीस स्टेशनचे अधिकारी जयश्री कदम, आणि सेवा संस्था ठाणे संस्थापक ॲडव्होकेट अशोक पवार, प्रकल्प समन्वयक वैभव गायकवाड, रामेश्वर भाले आणि ॲडव्होकेट संजीवनी जाधव यांनी यशस्वी केली.

logo
marathi.freepressjournal.in