अनधिकृत बांधकामावरील कारवाईला रहिवाशांचा विरोध, रहिवासी महिलांनी अंगावर रॉकेल ओतून नोंदविला निषेध

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून संपूर्ण शहरातील अनधिकृत बांधकामांच्या विरोधात कारवाईची मोहीम सुरू असून सोमवारी दुपारी बाळकुम येथील अनधिकृत इमारतीवर कारवाई करायला गेलेल्या महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाला रहिवाशांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
अनधिकृत बांधकामावरील कारवाईला रहिवाशांचा विरोध, रहिवासी महिलांनी अंगावर रॉकेल ओतून नोंदविला निषेध

ठाणे : ठाणे महापालिकेच्या माध्यमातून संपूर्ण शहरातील अनधिकृत बांधकामांच्या विरोधात कारवाईची मोहीम सुरू असून सोमवारी दुपारी बाळकुम येथील अनधिकृत इमारतीवर कारवाई करायला गेलेल्या महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाला रहिवाशांच्या रोषाला सामोरे जावे लागले. इमारत बांधेपर्यंत महापालिका झोपली होती का? असा प्रश्न उपस्थित करत या कारवाईला नागरिकांनी तीव्र विरोध केला. इमारतीपर्यंत जाणारा रस्ताचा नागरिकांनी अडवला तर काही महिलांनी अंगावर रॉकेल ओतून कारवाईमध्ये अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. नागरिकांच्या रोषाला बळी पडलेल्या ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण पथकाला अखेर कारवाई न करताच हात हलवत परतावे लागले.

ठाण्यातील बाळकुम पाडा न. १, दादलांनी रोड या ठिकाणी जय गजानन हाईट‌्स नावाची आठ मजली इमारत आहे. या इमारतीमध्ये ३० पेक्षा अधिक कुटुंब वास्तव्यास आहेत. सोमवारी दुपारी दीड ते दोनच्या दरम्यान ठाणे महापालिकेचे पथक या ठिकाणी कारवाईला पोचले. या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता. कारवाईसाठी पालिकेचे पथक या ठिकाणी पोचताच इमारतीमधील सर्व नागरिक खाली उतरले आणि पालिकेच्या कारवाईला विरोध केला. ठाणे महापालिकेचे उपायुक्त दिनेश तायडे आणि स्वतः अतिक्रमण विभागाचे उपायुक्त गजानन गोदापुरे हे देखील कारवाईच्या ठिकाणी हजर झाले. यावेळी गोदापुरे आणि स्थानिक रहिवाशांमध्ये शाब्दिक बाचाबाची देखील झाली. या कारवाईला विरोध केल्याने नागरिकांची चूक दाखवण्याचा प्रयत्न उपायुक्त गोदापुरे यांनी केला. मात्र इमारत बांधेपर्यंत ठाणे महापालिका झोपली होती का? असा प्रश्न यावेळी नागरिकांनी उपस्थित केला. यावेळी पोलिसांच्या मदतीने अतिक्रमण पथकाने इमारतीमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी काही महिलांनी आपल्या अंगावर रॉकेल टाकून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. तर काही रहिवासी हे इमारतीच्या छतावर असल्याने त्यांनी इमारती खाली उडी मारण्याचा इशारा दिला. नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे लक्षात आल्यांनतर अखेर पालिकेने नमती भूमिका घेत कारवाई न करताच पालिकेच्या पथकाला खाली हात परतावे लागले.

३० पेक्षा अधिक कुटुंबांचा निवारा प्रश्न कायम

सदरची इमारत ही गावठाण परिसरात असून या ठिकाणी पाच वर्षांपूर्वी ही इमारत बांधण्यात आली होती. पूर्वीच चार मजली इमारत धोकादायक झाल्याने पाच वर्षांपूर्वी आठ मजली नवी इमारत बांधण्यात आली होती. यामध्ये ३० पेक्षा अधिक कुटुंबे राहायला देखील आली होती. गावठाण परिसर सातबारा देखील नावावर होऊ शकत नव्हता. पूर्वीची इमारत ही धोकादायक झाल्याने या नागरिकांचा राहण्याचा प्रश्न निर्माण झाला होता.

रहिवाशांना दोन दिवसांची मुदत

पाच वर्षांपूर्वी ही आठ मजली इमारत बांधण्यात आली होती. एक तर ठाणे महापालिकेने कारवाई करण्यापूर्वी आम्हाला पर्यायी घरे उपलब्ध करून द्यावीत, त्यानंतरच कारवाई करावी अन्यथा ठाणे महापालिकेला कारवाई करू न देण्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे. दरम्यान, रहिवाशांना दोन दिवसांची मुदत देण्यात आली असून त्यानंतर पुन्हा कारवाईला सुरुवात होणार असल्याची माहिती उपायुक्त गोदापुरे यांनी दिली आहे.

logo
marathi.freepressjournal.in