
बदलापूर : बदलापुरात गेल्या काही दिवसांपासून रिक्षा प्रवास महागला आहे. पूर्वीचे प्रतिप्रवासी १५ रुपये असलेले भाडे ५ रुपयांनी वाढवून २० रुपये प्रति प्रवासी करण्यात आले आहे. सरसकट साडेतीन कि.मी. पर्यंतच्या प्रवासासाठी ही भाडेवाढ करण्यात आली असून ही भाडेवाढ रद्द करण्याची मागणी प्रवाशांकडून केली आत आहे.
बदलापूर पूर्व भागात स्टेशन ते कात्रप, शिरगाव, खरवई आदी भागात जाण्यासाठी प्रति प्रवासी १५ रुपये भाडे आकारले जात होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून या प्रवासी भाड्यात ५ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. सध्या सीएनजी दरात कोणतीही मोठी दरवाढ झालेली नाही किंवा आरटीओकडून नवे दरपत्रक काढण्यात आलेले नाही, असे असताना अचानक ही दरवाढ का? असा सवाल करीत ही दरवाढ रद्द करण्याची मागणी रिक्षा प्रवाशांकडून केली जात आहे. स्टेशनपासून अर्धा ते एक किमी अंतरावर राहणाऱ्या प्रवाशांनाही ही दरवाढ लागू असल्याने त्यांनी हा भुर्दंड का सहन करावा, असे प्रवाशांचे म्हणणे आहे.
नियमानुसार रिक्षात तीन प्रवाशांचीच वाहतूक
दरम्यान, याबाबत बदलापूर पूर्वेकडील रिक्षा चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष किशोर देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, दोन महिन्यांपूर्वी रिक्षा प्रवासी भाडे २० रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरसकट साडेतीन किमीपर्यंतच्या अंतरासाठी ही दरवाढ असून नियमानुसार रिक्षात तीन प्रवाशांचीच वाहतूक केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.