सावित्री नदी भरली! उल्हास नदी चौपाटी पाण्याखाली; प्रशासन अलर्ट मोडवर

गेल्या दोन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे उल्हास नदी दुथडी भरून वाहू लागली आहे.
सावित्री नदी भरली! उल्हास नदी 
चौपाटी पाण्याखाली; प्रशासन अलर्ट मोडवर
Published on

पोलादपूर : शुक्रवारी दुपारपासून पोलादपूर तालुक्यात पावसाने संततधार सुरू केली असून शुक्रवारपासून गेल्या ७२ तासांमध्ये ३६३ मि.मी. पावसाची नोंद झाल्याची माहिती पोलादपूर तहसील कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती निवारण कक्षाकडून देण्यात आली. शुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंत केवळ १५ मि.मी. पावसाची नोंद झाली असताना एकूण पावसाची नोंद ९६६ एवढी झाली. यानंतर दिवसभरामध्ये १०२ मि.मी. पाऊस सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पडला. शनिवार, दि.१३ जुलै रोजी सकाळी ८ वाजता झालेल्या नोंदीनुसार १३२ मि.मी. पाऊस होऊन एकूण पावसाची नोंद १०९८ एवढी झाली. रविवारी सकाळी १२५ मि.मी. पावसाची नोंद होऊन एकूण पावसाची नोंद १२२३ एवढी झाली. रविवारी देखील पावसाने बरसणे कायम ठेवल्याने सकाळी ८ वाजल्यापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत १०६ मि.मी. पाऊस पडल्याची माहिती पोलादपूर तहसील कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती निवारण कक्षाकडून देण्यात आली. पोलादपूर तालुक्यातील सर्व नद्यांची पात्रं तुडुंब दुथडी भरून वाहू लागली असून शेतामध्ये लावणीला हा पाऊस अनुकूल असल्याने शेतकऱ्यांनी आवणं रोवण्यासाठी कंबर कसली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. पोलादपूर शहरातील उत्तरवाहिनी सावित्री नदीचे पात्र सायंकाळी पाच वाजेपर्यंत दुथडी भरून वाहात असल्याने पावसाचा जोर कायम राहिल्यास नदीपात्र पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे नदीलगतच्या रस्त्यावरील घरे आणि दुकानदारांनी सामान सुरक्षितस्थळी हलविण्याची तयारी सुरू केल्याचे दिसून आले.

बदलापूर : गेल्या दोन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे उल्हास नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास उल्हास नदी धोक्याची पातळी गाठण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनही सज्ज झाले असून अग्निशमन दल उल्हास नदी परिसरात तळ ठोकून आहे. गेल्या दोन दिवसांपासून बदलापुरात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. शनिवारी रात्रीपासूनही जोरदार पाऊस सुरू होता. त्यामुळे रविवारी सकाळी उल्हास नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊन उल्हास नदी दुथडी भरून वाहू लागली होती. सकाळी उल्हास नदीच्या पाण्याची पातळी १६.१० मी. पर्यंत पोहचल्याने उल्हास नदी किनाऱ्यावर उभारण्यात आलेली चौपाटी पाण्याखाली गेली होती. पावसाचा जोर कायम राहिल्यास उल्हास नदी १६.५० मी. ही इशारा पातळी गाठण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यामुळे नगरपरिषद प्रशासन सज्ज झाले होते. मात्र पावसाचा जोर वाढण्याची शक्यता लक्षात घेता मुख्याधिकारी योगेश गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषद प्रशासन सज्ज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. उल्हास नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यानंतर अनेक हौशी लोकांनी सेल्फी घेण्यासाठी नदी परिसरात गर्दी केली होती. त्यामुळे सावधगिरीचा उपाय म्हणून नदी परिसरात बॅरिकेड्स उभारून लोकांना तिथे जाण्यास मज्जाव करण्यात आला असल्याची माहिती भागवत सोनोने यांनी दिली.

logo
marathi.freepressjournal.in