उरणला जलमार्गाने जोडणारी रो-रो सेवा अपूर्ण

उरणच्या मोरा व मुंबईतील भाऊचा धक्का दरम्यानच्या रो रो जलप्रवासात उरणच्या नागरिकांना चार व दुचाकी वाहन घेऊन मुंबईत जाता येणार आहे.
उरणला जलमार्गाने जोडणारी रो-रो सेवा अपूर्ण

राजकुमार भगत/उरण : उरणला जलमार्गाने मोरा ते मुंबईतील भाऊचा धक्का आणि करंजा ते रेवस या दोन्ही रो-रो सेवांचे काम रखडल्याने या रो-रो सेवांचे भवितव्य अधांतरित आहे. दोन्ही रो-रो सेवांसाठी जवळजवळ १०० कोटी रुपये शासन खर्च करणार आहे. यामध्ये मोरा जेट्टी ७५ कोटींची तर करंजा रेवस २५ कोटींचे काम आहे. या मार्गावरील कामाच्या दिरंगाईमुळे खर्चात ही वाढ झाली आहे. पूर्वी करंजा रेवस रो-रो साठी १०.५ कोटींची मंजुरी देण्यात आली होती, मात्र त्या कामात दिरंगाई झाल्यामुळे आता २५ कोटीपर्यंत त्याची वाढ झाली आहे. गेल्यावर्षी सुरू झालेल्या मोरा-भाऊचा धक्का या रो-रो सेवेचे काम देखील याच धर्तीवर आहे. मागील सहा महिन्यांपासून हे काम बंद आहे.

२०१८ ला मंजूर झालेल्या मोरा (उरण) ते मुंबई (भाऊचा धक्का) दरम्यानच्या रो-रो सेवेचे काम निधी अभावी रखडले आहे. मागील सहा महिन्यांपासून या जेट्टीवर एकही दगड पडलेला नाही. सागरमाला योजनेतूनच हा प्रकल्प राबविण्यात येणार असून त्यासाठी ८८ कोटी ७२ रुपयांचा आराखडा बनविण्यात आला होता. मात्र ७५ कोटी रुपये या प्रकल्पासाठी मंजूर करण्यात आले. गेल्या वर्षी या जेट्टीचे काम देखील सुरू करण्यात आले होते. मात्र सध्या हे काम बंद आहे. उरणमधील नागरिकांसाठी आपल्या खासगी वाहनांसह मुंबईत येजा करता यावे याकरीता मोरा ते मुंबई रो-रो सेवा सुरू करण्यात येणार आहे. या जलसेवेच्या कामाला सुरुवात झाली आहे. मोरा पोलीस ठाणे नजीक जेट्टीचे काम सुरू असून दगडांचा भराव करून जेट्टी बांधण्यात येत आहे.

उरणच्या मोरा व मुंबईतील भाऊचा धक्का दरम्यानच्या रो रो जलप्रवासात उरणच्या नागरिकांना चार व दुचाकी वाहन घेऊन मुंबईत जाता येणार आहे. त्यामुळे वाहनासह उत्तम प्रवासाची सोय उपलब्ध होणार आहे. तर दुसरीकडे उरण व अलिबाग या दोन तालुक्यांदरम्यान दोन किलोमीटरचे सागरी अंतर असून अनेक वर्षांपासून या मार्गावरून प्रवास करण्यासाठी छोट्या बोटीचा (तरीचा) वापर केला जात आहे. ही सेवा अपुरी असल्याने या सागरी मार्गावर रो-रो सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाने तयार करून कामाला सुरुवात केली त्यानुसार २५ कोटी रुपये खर्च करून उरणच्या करंजा बंदरात रो-रो ची स्वतंत्र जेट्टी तसेच तिकीट घर, कार्यालय व वाहनतळ आदींची उभारणी करण्यात आली आहे. मात्र अलिबागमधील रेवस जेट्टीचे काम अपूर्ण असल्याने ही सेवा रखडली आहे. रेवस जेट्टीचे काम सुरू असल्याची माहिती मेरीटाइम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

उरण ते अलिबाग प्रवाशांच्या संख्येत वाढ

या रो-रो सेवेमुळे उरण व अलिबागच्या प्रवासी व नागरिकांना आपल्या चारचाकी वाहनाने प्रवास करता येणार आहे. त्यामुळे या दोन्ही तालुक्यातील ५० किलोमीटरपेक्षा अधिकचे रस्ते मार्गातील अंतर कमी होणार आहे. उरणमधील वाढते उद्योग आणि नवी मुंबईच्या जवळ असणारे शहर म्हणून तसेच उरणमधून नव्याने लोकल सुरू झाली आहे. त्यामुळे नोकरी, व्यवसाय व शिक्षण यानिमित्ताने उरण ते अलिबाग दरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

भारत सरकारच्या सागरमाला योजनेतून रस्त्यावरील वाहनांचा भार कमी करण्यासाठी जलवाहतुकीला प्रोत्साहन दिले जात आहे. सागरमाला योजनेतूनच हा प्रकल्प राबविण्यात येत आहेत. मोरा-मुंबई रो-रो सेवेच्या कामास सुरुवात झाल्यापासून दोन वर्षांत काम पूर्ण करण्यात येणार आहे. नवीन मोरा जेट्टी सुरू झाल्यानंतर तिथून रो-रो सेवा सुरू होणार असून भाऊचा धक्का ते उरण हे अंतर यामुळे ३० मिनिटांत पार करता येणार आहे, तर करंजा-रेवस रोरो सेवेमधील करंजा बंदरातील काम पूर्ण झाले आहे, मात्र रेवस बंदरातील काम अपूर्ण आहे.

- सुधीर देवरे (कार्यकारी अभियंता महाराष्ट्र मेरीटाइम मंडळ)

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in