
ठाणे : आगामी ठाणे महानगर पालिका निवडणुकीत रिपाइं आठवले गट हा १३ जागा लढवणार असून तसा प्रस्ताव आपण महायुतीकडे ठेवला असल्याची माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी ठाण्यात दिली.
ठाण्यातील अंबिका नगर येथील रिपाइं कार्यकर्ते प्रल्हाद मगरे यांच्या बंधूंचे नुकतेच निधन झाले असून मगरे कुटुंबियांची आठवले यांनी सांत्वनपर भेट घेतली. त्यावेळेस पत्रकारांशी संवाद साधताना रामदास आठवले बोलत होते. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष भास्कर वाघमारे, प्रमोद इंगळे, तात्याराव झेंडे, युवक अध्यक्ष भालेराव, विमल सातपुते, मनिषा करलाद आदी उपस्थित होते.
आठवले म्हणाले की, रिपाइंचे कितीही गट असले तरी आमचा गट प्रबळ आहे. त्यामुळे आम्ही ठाणे पालिकेच्या निवडणुकीत आम्ही प्रबळ दावेदार आहोत. २०१४ मध्ये उद्धव ठाकरे यांनी चुकीची भूमिका घेतली होती. त्यामुळेच त्यांना आता सत्तेच्या बाहेर रहावे लागले आहे. जर ते सोबत असते तर कदाचित भाजप, सेना, रिपाइं युतीला एकहाती बहुमत मिळाले असते.
हिंदी भाषेच्या सक्तीबाबत विचारले असता, उद्धव ठाकरे हे हिंदीला विरोध करीत असतील तर ते चुकीचे आहे. देशभर हिंदी भाषा बोलली जात आहे. हिंदी ही राष्ट्रीय भाषा आहे.
जर, हिंदीला विरोध केला जात असेल तर तो संविधानाला विरोध आहे, असे आठवले म्हणाले. समाजकल्याण खात्याचा निधी लाडकी बहीण योजनेला वळविला आहे, याबाबत ते म्हणाले की, निधी वळविला असेल आणि त्यातून शिष्यवृत्ती रखडली असेल तर ते योग्य नाही. कारण, केंद्राने शिष्यवृत्तीसाठी निधी पाठविला आहे. आता राज्य सरकारने समाजकल्याणचा निधी परत करावा, अशी मागणीही आठवले यांनी केली.