जिल्ह्यात यंदा आरटीईच्या जागा वाढल्या : २,६१६ शाळांची नोंदणी; ३६,८२८ रिक्त जागा

समाजातील दुर्बल, वंचित तसेच शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागास घटकांतील बालकांना मोफत व उच्च प्रतीचे व दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी शासनातर्फे आरटीई २५ टक्के अंतर्गत शाळा प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत असते.
जिल्ह्यात यंदा आरटीईच्या जागा वाढल्या : २,६१६ 
शाळांची नोंदणी; ३६,८२८ रिक्त जागा

ठाणे : मोफत शिक्षण हक्क कायद्यांतर्गत २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया मंगळवारपासून सुरू झाली असून ३० एप्रिलपर्यंत विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज स्वीकारले जाणार आहेत. यंदा आरटीई अंतर्गत प्रवेश देणाऱ्या शाळा तसेच रिक्त जागांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जिल्ह्यातील २ हजार ६१६ शाळांनी आरटीईसाठी नोंदणी केली आहे. याअंतर्गत जिल्ह्यातील तब्बल ३६ हजार ८२८ विद्यार्थ्यांना दर्जेदार शाळांमध्ये मोफत प्रवेश मिळणार आहे. पालकांनी आरटीईच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनी केले आहे. नवी मुंबई १३८ शाळा आरटीई अंतर्गत नोंदणी करण्यात आली आहे.

समाजातील दुर्बल, वंचित तसेच शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागास घटकांतील बालकांना मोफत व उच्च प्रतीचे व दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी शासनातर्फे आरटीई २५ टक्के अंतर्गत शाळा प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत असते. यंदा ठाणे जिल्हा परिषद, सर्व पंचायत समित्या व महापालिका क्षेत्रातील अनुदानित, विनाअनुदानित व खासगी शाळांमध्ये ही प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. मागील वर्षी ठाणे जिल्ह्यातील ६५८ खासगी व विनाअनुदानित शाळांमध्ये ही प्रक्रिया राबविण्यात आली होती. याअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी १२ हजार २७८ रिक्त जागा उपलब्ध झाल्या होत्या. यंदा मात्र आरटीईसाठी जिल्ह्यातील २ हजार ६१६ शाळांनी नोंदणी केली आहे. याअंतर्गत जिल्ह्यातील तब्बल ३६ हजार ८२८ विद्यार्थ्यांना दर्जेदार शाळांमध्ये मोफत प्रवेश मिळणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

शासकीय शाळांमध्येही घ्यावा लागणार प्रवेश

आरटीई कायद्यात केलेल्या नवीन बदलानुसार खासगी, विनाअनुदानित शाळांच्या एक किमी परिघात शासकीय, तसेच अनुदानित शाळा असेल, तर त्या खासगी शाळेत ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के जागांवर प्रवेश घेता येणार नाही. यंदा मात्र खासगीसह अनुदानित आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांनी देखील आरटीई पोर्टलवर नाव नोंदणी केली आहे, त्यामुळे नोंदणी केलेल्या शाळा व रिक्त जागांमध्ये वाढ झाली असून, पालकांना यंदा ‘आरटीई’तून शासकीय शाळांतही प्रवेश मिळणार आहे.

अशी करा नोंदणी

आरटीई अंतर्गत पाल्यांना शिक्षणाचा लाभ मिळवून देण्यासाठी पालकांना ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. ऑनलाईन प्रक्रियेद्वारे नोंदणी झाल्यानंतर, आरटीईचा लाभ घेता येईल. नोंदणीसाठीचे नियम, पालकांसाठी मदत केंद्रांची यादी, ऑनलाईन प्रक्रियेत अर्ज नोंदणीबाबत मार्गदर्शक पुस्तिका, आवश्यक कागदपत्रे आदींबाबत https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in