ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी मुंब्र्यात केलेल्या भाषणावरून ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे.
ऋता आव्हाड यांनी आपल्या भाषणात डॉ. अब्दुल कलाम कसे घडले, यासाठी त्यांचे चरित्र वाचा असे आवाहन श्रोत्यांना केले. मात्र हे सांगितल्यानंतर ऋता आव्हाड पुढे म्हणाल्या की, आयुष्याची दुसरी बाजूही असते, ओसामा बिन लादेन जन्मापासून दहशतवादी नव्हता त्याला समाजाने दहशतवादी बनवले, असे त्या म्हणाल्या. ऋता आव्हाड यांच्या या विधानामुळे सत्ताधारी पक्षाच्या हातात आयते कोलीत मिळाले आहे. त्यावरुन विरोधकांनी धारेवर धरल्यानंतर आता ऋता आव्हाड यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
‘माझ्या भाषणाचा चुकीचा अर्थ काढला गेला’
तिथे बसलेल्यांनी फक्त माझे ते एक वाक्य पकडले. आम्ही आमच्या मनातले विचार हे चॅनलचे कोण बसलंय हे बघून बोलायचे का? असा प्रश्न ऋता आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. समोरच्या श्रोत्यांना मला हे असे सांगायचे होते की, लादेन हा वाईटच होता परंतु तो तसा का झाला हे वाचले पाहिजे. रामायण वाचताना आपण रावणाला ही वाचतो ना? रावण होता म्हणून अख्खं रामायण घडले, नाहीतर घडलेच नसते. जे काही हल्ली चाललेय ते खूप चुकीचे असून माझ्या भाषणाचा चुकीचा अर्थ काढला गेला, असे ऋता आव्हाड म्हणाल्या.