

ठाणे : ठाणे शहराची ओळख असलेल्या आनंद, वंदना, मल्हार आणि गणेश या जुन्या चित्रपटगृहांच्या इमारतींच्या सुरक्षेबाबत धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ३० ते ५७ वर्षे जुन्या असलेल्या या चारही इमारतींचे अद्याप स्ट्रक्चरल ऑडिट झाले नसल्याची कबुली ठाणे महापालिका प्रशासनाने दिली आहे. विशेष म्हणजे, चित्रपटगृहे बंद असली तरी त्याच इमारतींमध्ये मॅरेज हॉल, जिम, वाहन शोरूम, लाऊंज यांसह विविध व्यावसायिक आस्थापने सुरू आहेत. त्यामुळे या ठिकाणी ये-जा करणाऱ्या हजारो नागरिकांच्या जीवित सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी विचारलेल्या प्रश्नाला महापालिकेने दिलेल्या लेखी उत्तरातून हा प्रकार उघडकीस आला आहे. महापालिकेच्या धोरणानुसार ३० वर्षांहून अधिक जुन्या इमारतींची संरचनात्मक तपासणी करणे बंधनकारक आहे. मात्र, संबंधित विभागाकडे आनंद, वंदना, मल्हार आणि गणेश या एकाही चित्रपटगृहाचा स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल उपलब्ध नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
महापालिकेच्या नोंदीनुसार, गणेश चित्रपटगृहाला १२ जुलै १९६९ रोजी, तर मल्हार चित्रपटगृहाला १३ ऑक्टोबर १९८१ रोजी बांधकाम परवानगी देण्यात आली होती.
वंदना चित्रपटगृहाचे बांधकाम १९९७-९८ मध्ये, तर आनंद चित्रपटगृहाचे बांधकाम १९९९ मध्ये झाले. त्यामुळे गणेश आणि मल्हार ही चित्रपटगृहे अनुक्रमे सुमारे ५७ आणि ४५ वर्षे जुनी झाली आहेत.एकेकाळी हिंदी-मराठी चित्रपटांचे साक्षीदार असलेली ही चित्रपटगृहे मल्टिप्लेक्सच्या युगात बंद पडली. मात्र, आजही त्यांच्या इमारतींमध्ये विविध व्यावसायिक उपक्रम सुरू असल्याने या इमारतींच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
व्यावसायिक परवानगीचा अभाव?
याहून गंभीर बाब म्हणजे, या चित्रपटगृहांच्या जागेचा वापर बदलून मॅरेज हॉल, जिम, वाहन शोरूम, लाऊंज आदी व्यावसायिक उपक्रम सुरू करण्यासाठी शहर विकास विभागाने परवानगी दिल्याची कोणतीही नोंद उपलब्ध नसल्याचे महापालिकेने आपल्या उत्तरात स्पष्ट केले आहे. त्यामुळे मूळ चित्रपटगृहांच्या जागेचा व्यावसायिक वापर नेमका कोणत्या परवानगीच्या आधारे सुरू आहे, हा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे.
अग्निसुरक्षा संशयाच्या भोवऱ्यात
आनंद चित्रपटगृहाची अग्निसुरक्षा तपासणी करण्यात आली आहे. मात्र, वंदना, मल्हार आणि गणेश चित्रपटगृहे बंद असल्याचे सांगत प्रशासनाने या इमारतींच्या अग्निसुरक्षेबाबत ठोस माहिती दिलेली नाही. या ठिकाणी सुरू असलेल्या मॅरेज हॉल, जिम, वाहन शोरूम आणि इतर व्यावसायिक आस्थापनांच्या अग्निसुरक्षा तपासणीबाबतही कोणतीही माहिती प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
मालमत्ता कर नियमित; सुरक्षेची मात्र उपेक्षा?
चित्रपटगृहे बंद असली तरी महापालिकेला त्यांच्याकडून नियमितपणे मालमत्ता कर मिळत आहे. सन २०२५-२६ मध्ये आनंद टॉकीजने १५.८२ लाख रुपये, वंदना चित्रपटगृहाने २.३२ लाख रुपये, मल्हार चित्रपटगृहाने ४.४० लाख रुपये, तर गणेश टॉकीजने २.८६ लाख रुपये मालमत्ता कर भरला आहे. कर वसूल करणाऱ्या महापालिकेने मात्र या जुन्या इमारतींच्या संरचनात्मक सुरक्षिततेकडे तसेच त्यातील व्यावसायिक वापराच्या वैधतेकडे दुर्लक्ष केल्याची टीका आता होत आहे. जुन्या इमारतींमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांची वर्दळ असताना त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट, अग्निसुरक्षा तपासणी आणि व्यावसायिक वापराची वैधता याबाबत महापालिकेने तातडीने स्पष्टता देऊन आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.