'सगेसोयरे मॅनेजमेंट' निवडणूक प्रचाराचा नवा पॅटर्न; हा नवा पॅटर्न कितपत यशस्वी ठरतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार

सध्या भिवंडी लोकसभा मतदारसंघात निवडणूक प्रचाराला चांगलाच जोर आला आहे.
'सगेसोयरे मॅनेजमेंट' निवडणूक प्रचाराचा नवा पॅटर्न; हा नवा पॅटर्न कितपत यशस्वी ठरतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार
Published on

बदलापूर : सध्या भिवंडी लोकसभा मतदारसंघात निवडणूक प्रचाराला चांगलाच जोर आला आहे. मात्र यंदाच्या निवडणुकीत राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्याबरोबरच उमेदवारांची 'सगेसोयरे' टीमही प्रचारात ॲक्टीव झाल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे त्यांच्याकडे प्रचाराच्या नियोजनाच्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्याही सोपविण्यात येत असल्याने 'सगेसोयरे मॅनेजमेंट' या नव्या पॅटर्नची जोरदार चर्चा आहे.

आतापर्यंत लोकसभा निवडणूक म्हटले म्हणजे उमेदवाराच्या प्रचाराचे संपूर्ण नियोजन त्या मतदारसंघातील जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय व स्थानिक पातळीवर पदाधिकारी करीत असत. त्यासाठी पदाधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या कमिटी तयार करून पक्षाचे ज्येष्ठ नेते त्यांना प्रचाराच्या नियोजनाबाबत मार्गदर्शन करत असत. वेळोवेळी हे ज्येष्ठ नेते या नियोजनाचा आढावाही घेत असत. त्यामध्ये लवकरात लवकर जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी भागाभागात प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांची टीम तयार करणे, त्यांना टोप्या, पक्ष चिन्ह छापलेले स्कार्फ, झेंडे, पक्ष चिन्हांचे बिल्ले, पक्षाचा जाहीरनामा, उमेदवाराचा परिचय करून देणारे पत्रक आदी प्रचार साहित्य उपलब्ध करून देणे, कार्यकर्त्यांना शहराच्या भागाभागात प्रचारासाठी जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था करणे, प्रचारकांच्या चहापाण्याची, नाश्ता-जेवणाची व्यवस्था करणे, चौक सभा तसेच जाहीर सभांचे नियोजन करणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या सर्व खर्चाचे नियोजन करण्याची जबाबदारीही पक्षाच्या या कमिटीकडे असे. परंतु यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बहुतांश राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी यासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या कमिटी बरोबरच 'सगेसोयरे मॅनेजमेंट' टीमही सक्रिय केली असल्याचे दिसत आहे. 'सगेसोयरे मॅनेजमेंट' टीम व पक्षाचे कार्यकर्ते यांच्यात समन्वय राहिल्यास निश्चितच उमेदवाराला त्याचा फायदा होऊ शकतो. मात्र त्यांच्यात समन्वय न राहिल्यास त्याचा फटकाही बसू शकतो.

मतदानात मोलाचे योगदान

प्रचारासाठी लागणारे खर्चाचे नियोजन तसेच प्रचाराच्या कामाचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष आढावा घेण्याची जबाबदारीही अशाच 'सगेसोयरे मॅनेजमेंट' टीमकडे दिली जात असल्याचे राजकीय कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे. असे असले तरी कोणत्याही पक्षाचा पदाधिकारी वा कार्यकर्ता हीच त्या पक्षाची जनमानसातील ओळख असते. त्यामुळे राजकीय पक्षांचे पदाधिकारी किंवा कार्यकर्त्यांचे उमेदवाराला मिळणाऱ्या मतदानात मोलाचे योगदान असते.

भिवंडीत सक्रिय

लोकसभा मतदारसंघातील राजकीय पक्षांचे उमेदवार हे जिल्ह्यातील स्थानिक असल्याने त्यांचे अनेक सगेसोयरे मतदारसंघात वास्तव्याला आहेत. नातेसंबंधांमुळे कुटुंबातील सदस्य या भावनेने ते उमेदवाराच्या प्रचारकार्यात सक्रिय होत असतात. असे अनेक सगेसोयरे सध्या भिवंडी लोकसभा मतदारसंघात सक्रिय असल्याचे सध्या पाहायला मिळत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in