रायगडमध्ये आता साखरचौथ गणपती उत्सवाचे वेध !

संकष्टी चतुर्थीला या गणपतीचे आगमन होणार असून पुन्हा एकदा गणपती बाप्पा मोरयाचा गजर गावागावात घुमणार आहे
रायगडमध्ये आता साखरचौथ गणपती उत्सवाचे वेध !

पाच आणि दहा दिवसांच्या बाप्पाला पाणावलेल्या डोळ्यांनी निरोप देऊन काही अवधी जात नाही तोच सर्वांना वेध लागले आहेत ते साखरचौथीच्या गणपतीचे. गणेशोत्सवानंतर येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला जिल्ह्यात ठिकठिकाणी गणपती मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात येते. यावेळी गणपतीला खोबर आणि साखरेचे सारणाच्या मोदकाचा नैवेद्य दाखवितात म्हणून या गणेशोत्सवाला साखरचौथीचा गणपती उत्सव असे म्हणतात म्हणतात.

येत्या मंगळवारी १३ सप्टेंबर २०२२ रोजी संकष्टी चतुर्थीला या गणपतीचे आगमन होणार असून पुन्हा एकदा गणपती बाप्पा मोरयाचा गजर गावागावात घुमणार आहे. रायगड जिल्ह्यासह पेण तालुक्यात ठिकठिकाणी हा उत्सव मोठ्या भक्तीभावाने व उत्साहात साजरा करण्यात येतो. यामध्ये सार्वजनिक तसेच खाजगी गणपतींचा देखील समावेश असतो. गणेशोत्सव काळात पेणमधील जवळपास ६० ते ७० टक्के नागरिक गणपती कारखान्यात व्यस्त असल्याने संपूर्ण देशभरात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवामध्ये त्यांना उत्स्फूर्तपणे सहभाग घेता येत नाही. त्यामुळे पेणसह जिल्ह्यात साखरचौथ गणपती बसविण्याची प्रथा तयार झाली आहे. मागील काही वर्षात १० दिवसांच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनानंतर येणाऱ्या पहिल्या संकष्टी चतुर्थीला उत्सवाचे रूप प्राप्त झाले आहे.

यावेळी विविध कार्यक्रमांची रेलचेल असते.भजन, कीर्तन, प्रवचन, मनोरंनाचे कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम,विविध स्पर्धा होत असतात. यामुळे हे दिवस धामधुमीत जातात. कोरोनाचे संकट असल्याने हा उत्सव शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून साजरा करण्यात येणार असल्याचे अनेक मंडळाच्या सभासदांनी सांगितले आहे.

पेण शहरात गुरव आळीचा राजा, रामवाडीचा राजा, अष्टविनायक मित्र मंडळ, प्रेम नगर मित्र मंडळ, श्री दत्त मंडळ, अमर ज्योत मित्र मंडळ, श्री मित्र मंडळ विठ्ठल आळी व इतर मंडळांसह ग्रामीण भागात उंबर्डे येथील वज्रादेवी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे गेली अनेक वर्ष हा उत्सव साजरा करण्यात येतो. प्रत्येक वर्षी नवनवीन विषयावरील देखावे हे या मंडळांचे आकर्षण असते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in