
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याबद्दल बोलताना जीभ घसरली. यानंतर आता याचे पडसाद दिसून येत असून त्यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाविरोधात ठाणे आणि नाशिकमध्ये गुन्हे दाखल केले आहेत. नाशिकमधील पंचवटी पोलीस ठाण्यात संजय राऊत यांच्याविरोधात कलम ५०० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते योगेश बेलदार यांनी हा गुन्हा दाखल केला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारख्या व्यक्तीच्या आणि मुख्यमंत्री पदाच्या लौकिकास बाधा आणत बदनामी केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल केला आहे.
तसेच, ठाण्यामध्येही संजय राऊत यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यातील शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडीने संजय राऊत यांच्या विधानाचा निषेध करत 'जोडे मारो' आंदोलन केले होते. त्यानंतर ठाणे नगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल करून अखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. यानंतर पोलिसांनी अधिक माहिती घेऊन याबद्दल चौकशी करू, असे आश्वासन दिले आहे. नाशिक पाठोपाठ आता ठाण्यामध्येही त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल झाल्याने त्यांच्या अडचणीत चांगलीच वाढ होताना दिसत आहे.