ठाण्यातील बाजारात संक्रांतीचा उत्साह

वाण म्हणजे संक्रांतीनिमित्त भेटवस्तू देणे. संक्रांतीच्या निमित्ताने घरी येणाऱ्या महिलांना भेटवस्तू देत असतात. संक्रांतीसाठी लागणाऱ्या विविध वस्तूंनी सध्या ठाण्याची बाजारपेठ सजली आहे.
ठाण्यातील बाजारात संक्रांतीचा उत्साह

ठाणे : मकर संक्रांतीचा सण आता काही तासांवर येऊन ठेपला आहे. महिला वर्गामध्ये संक्रांतीचे विशेष महत्त्व असते. या निमित्ताने महिला हळदी-कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करतात. त्याबरोबरच संक्रांतीच्या दिवशी पाच, सात, अकरा, एकवीस याप्रमाणे महिलांना बोलावून वाण देण्याची प्रथा आहे. वाण म्हणजे संक्रांतीनिमित्त भेटवस्तू देणे. संक्रांतीच्या निमित्ताने घरी येणाऱ्या महिलांना भेटवस्तू देत असतात. संक्रांतीसाठी लागणाऱ्या विविध वस्तूंनी सध्या ठाण्याची बाजारपेठ सजली आहे.

नववधू आणि मुलांसाठी हलव्याच्या दागिन्यांचे वैविध्यपूर्ण प्रकार यंदा पहायला मिळत आहेत. पारंपारिक हार, कानातले, बाजूबंद, गळ्यातल्यासोबत बांगड्या, पाटल्या, तोडे यामध्ये वेगळेपण दिसून येते. लहान मुलांच्या दागिन्यांमध्ये बासरी, मुकुट यासह हातातली वाळी, कडे, गळ्यातले हारही बाजरात उपलब्ध आहेत.

मकर संक्रांतीच्या सणासाठी बाजारपेठ यंदा चांगलीच सजली आहे. मकर संक्रांतीनिमित्त वेगवेगळ्या गोष्टी बाजारात येत असून त्या खरेदी करण्यासाठी आम्ही बाजारात आलो आहोत. माझी यंदा पहिलीच संक्रांत असल्याने वेगवेगळ्या वस्तू खरेदी करून सुंदर दिसावे यासाठी प्रयत्न सुरू आहे, अशी प्रतिक्रिया खरेदीसाठी आलेल्या महिला ग्राहकाने व्यक्त केली. विविध प्रकारचे गळ्यातले हारही यंदा बाजारात उपलब्ध झाले आहेत.

संक्रांतीला विशेष मान असणारे हलव्याचे दागिने, तीळगूळ, वाण म्हणून वाटण्यासाठी गृहोपयोगी वस्तू यांच्या खरेदीला महिलांचे प्राधान्य होते. बाजारात तीळाची रेवडी, गुलाबी रेवडी, लाडू, तीळ वडी, चिक्की, पांढरे साखरेचे तीळगूळ यांना जास्त मागणी होती. संक्रांतीला जसे तीळगूळाचे महत्त्व आहे, तसेच सुगडाचा वसादेखील महत्त्वाचा आहे. संक्रांतीला महिला सुगडाचा वसा घेऊन मंदिरात जातात. तीळगूळ, गाजर, हरभरा, बोर, ऊस, धान्याचे कणीस, एखादे फळ यांचा महिला सुगड तयार करतात.

तीळगुळाच्या वड्या व लाडूंनाही मागणी

वाणासह भेटवस्तू म्हणून देण्यासाठी रंगीबेरंगी पर्सेस, हातरुमाल, शोभेच्या वस्तू आदींच्या खरेदीलाही काही स्त्रियांनी पसंती दिली. संक्रांतीच्या सणाला काळ्या कपड्यांचे विशेष महत्त्व असते. विशेषतः लहान मुलांना या सणानिमित्त काळे कपडे भेट देऊन त्यांचे बोरन्हाण केले जाते. त्यासाठी काळ्या रंगांचे परकर पोलके आणि कुर्तेही बाजारात उपलब्ध होते. बोरन्हाणासाठी लागणाऱ्या बोरे, चुरमुरे, उसाचे तुकडे तसेच गोळ्या, बिस्किटे, चॉकलेट यांचीही खरेदी केली जात होती. तर संक्रांतीला विशेष महत्त्व असणाऱ्या तिळगुळाच्या वड्या व लाडूंनाही मागणी होती.

logo
marathi.freepressjournal.in