बदलापूर : मागील ३२ वर्षांपासून मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरे राबवून करून हजारो रुग्णांना दिलासा देणारे बदलापुरातील दृष्टीमित्र साकीब गोरे यांनी बदलापुरात मोतीबिंदू सोशल अँड एक्सपिरियन्स सेंटर उभारण्यास सुरुवात केली आहे. हे जगातील पहिले मोतीबिंदू सोशल अँड एक्सपिरियन्स सेंटर असेल आणि मोतीबिंदू आजाराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करून गरजू रुग्णांना तत्काळ सेवा उपलब्ध करून देण्यात ते महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास साकीब गोरे यांनी व्यक्त केला आहे.
जागतिक आरोग्य दिनानिमित्त रविवारी (ता. ७) या रिसर्च सेंटरचे भूमिपूजन करण्यात आले. बदलापूर पूर्वेकडील कात्रप परिसरातील पनवेल हायवेजवळ दीड एकर जागेत सुमारे ५२ हजार चौरस फूटपेक्षा जास्त क्षेत्रफळात या सेंटरची उभारणी होणार आहे. रोमन डिझाईनमध्ये उभारण्यात येणाऱ्या या भव्य रिसर्च सेंटरमध्ये मोतीबिंदू रुग्णांसाठी मिनी थिएटर, संग्रहालय, हॉटेल आदी सुविधाही असणार आहेत. वास्तविक पाहता १९७६ मध्ये जगात सर्वप्रथम भारताने राष्ट्रीय अंधत्व निवारण अंतर्गत मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. म्हणजेच भारत मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा जनक आहे. असे असताना जगातील सर्वात मोठा डोळा अमेरिकेत का? जगातील सर्वात मोठा चष्मा नेदरलँडला का? असे प्रश्न गेल्या ३२ वर्षात मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया राबवताना मनात येत होते. त्यातूनच मोतीबिंदू सोशल अँड एक्सपिरियन्स सेंटर उभारण्याचा निर्णय घेतल्याचे साकीब गोरे यांनी सांगितले.
आतापर्यंत जगात कुठेही मोतीबिंदू सोशल अँड एक्सपिरियन्स सेंटर नसून बदलापुरात उभारले जाणारे हे सेंटर जगातील पहिले मोतीबिंदू सोशलअँड एक्सपिरियन्स सेंटर असेल असे त्यांनी स्पष्ट केले. येत्या वर्षभरात हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. या सेंटरमध्ये जगातील सर्वात मोठा मोतीबिंदू डोळा व सर्वात मोठा चष्मा तयार करून जागतिक पातळीवर बदलापूरचे आणि भारताचे नाव नेण्याचा संकल्प असल्याचे साकीब गोरे यांनी सांगितले. मोतीबिंदू आजाराच्या संभाव्य दुष्परिणामाबाबत जनजागृती करण्यासाठी एक हेल्पलाईन सुरू करण्यात येणार आहे. त्या माध्यमातून गरजू रुग्णांना वेळेवर नजीकच्या रुग्णालयात उपचार मिळण्यास मदत होईल, असे साकीब गोरे यांनी सांगितले.
जगातील सर्वात स्वस्त चष्मा देणार
चष्मा ही फॅशन नसून गरज आहे. परंतु गरजवंतांना आवश्यकता असूनही चष्मा खरेदी करता येत नाही. अशा लोकांसाठी सेंटरच्या माध्यमातून जगातील सर्वात स्वस्त चष्मा अवघ्या ९ रुपयात उपलब्ध करून देणार असल्याचे साकीब गोरे यांनी सांगितले. बाजारात १२०० ते १५०० रुपयांना मिळणारे चष्मे अवघ्या ९ ते ३०० रुपयांत उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
५६ हजार मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया
गेल्या ३२ वर्षांत साकीब गोरे यांच्या माध्यमातून ५६ हजार रुग्णांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या आहेत. दृष्टीदोष असलेल्या २० लाख लोकांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली आहे. तर १५ लाख लोकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे कोणतीही संस्था, एनजीओ किंवा एखाद्या उद्योगपतीकडून आर्थिक पाठबळ नसताना ही रुग्णसेवा करू शकलो, हे त्या रुग्णांचे आशीर्वादच असल्याची भावनाही साकीब गोरे यांनी व्यक्त केली.