उल्हासनगर : उल्हासनगरच्या पर्यावरण व सामाजिक क्षेत्रातील लढाऊ आवाज गुरुवारी कायमचा शांत झाला. शहरातील प्रदूषणविरोधी आंदोलनांपासून ते ध्वनीप्रदूषण विरोधात न्यायालयीन लढ्यात अग्रस्थानी राहिलेल्या पर्यावरणप्रेमी व आरटीआय ॲक्टिवीस्ट ॲड. सरिता खानचंदानी यांनी गुरुवारी आत्महत्येचा प्रयत्न केला आणि उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने शहरभर शोककळा पसरली आहे. हिराली फाऊंडेशन या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून त्यांनी उल्हासनगरच्या पर्यावरणाला नवा श्वास देण्याचा ध्यास घेतला होता. परंतु त्यांच्या अचानक जाण्याने नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व पर्यावरणप्रेमी हळहळ व्यक्त करत आहेत.
गुरुवारी सकाळी उल्हासनगर कॅम्प ४ मधील विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनसमोरील रोमा अपार्टमेंटवरून ॲड. सरिता खानचंदानी यांनी उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने उल्हासनगरच्या बालाजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून त्यांना मॅक्सिलाइफ हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. परंतु प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना पुढे डोंबिवली येथील एम्स रुग्णालयात रेफर करण्यात आले. मात्र, सर्व प्रयत्नांनंतरही त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेनंतर उल्हासनगरात शोककळा पसरली असून, नागरिक व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांमध्ये मोठा प्रदूषणाविरुद्ध त्यांनी उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा नेला.
त्यांच्या पुढाकारामुळे उल्हासनगरात डीजे व ध्वनी प्रदूषणावर मोठा आळा बसला आणि नागरिकांना दिलासा मिळाला. इतकंच नव्हे तर वालधुनी नदी प्रदूषणाविरोधातही त्यांनी न्यायालयीन याचिका दाखल करून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. नदी स्वच्छ व्हावी, नागरिकांना शुद्ध पाणी व आरोग्यदायी पर्यावरण मिळावे, यासाठी त्यांची सततची झुंज सुरू होती. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे पर्यावरण संरक्षणाच्या लढ्याला नवा चेहरा मिळाला होता. आज त्यांच्या जाण्याने शहराने एक निर्भीड, जिद्दी आणि पर्यावरणासाठी आयुष्य वेचणारी लढवय्यी कार्यकर्ती गमावली आहे. त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या लढ्याला पुढे नेण्याची जबाबदारी आता नागरिकांवर व सामाजिक क्षेत्रावर येऊन ठेपली आहे. उल्हासनगरातील सामाजिक संघटना, पर्यावरणप्रेमी आणि सर्वसामान्य नागरिकांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला असून, त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
आत्महत्येचा व्हिडीओ व्हायरल
सरिता खानचंदानी यांचा रोमा इमारतीच्या टेरेसवरून आत्महत्या करतांनाचा व्हिडीओ एका नागरिकांने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.