भिवंडीत धोकादायक इमारतीत भरतेय शाळा! विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात; शिक्षण विभागाचे दुर्लक्ष

बांधकाम झाल्यापासून अवघ्या १२ ते १५ वर्षांतच सदर इमारतीची अवस्था धोकादायक झाली आहे.
भिवंडीत धोकादायक इमारतीत भरतेय शाळा! विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात; शिक्षण विभागाचे दुर्लक्ष

भिवंडी : तालुक्यातील पिंपळास गावातील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचे बांधकाम अत्यंत निष्कृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे. त्यामुळे बांधकाम झाल्यापासून अवघ्या १२ ते १५ वर्षांतच सदर इमारतीची अवस्था धोकादायक झाली आहे. याबाबत शालेय शिक्षण समिती पिंपळास यांच्या वतीने शाळेच्या दुरुस्तीसाठी पंचायत समिती शिक्षण विभागास पत्रव्यवहार करण्यात आले आहे. परंतु शिक्षण विभाग अक्षम्य दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे तात्काळ इमारतीची डागडुजी न झाल्यास शिक्षण विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा भूमिपुत्र शेतकरी संघटना पिंपळासच्या वतीने लेखी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

भिवंडी येथील पिंपळास गावातील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचे बांधकाम अत्यंत निष्कृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे. मागील ७ ते ८ महिन्यांपासून शाळेच्या इमारतीचे कॉलम तुटले असून, मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. तसेच स्लॅबचे प्लास्टर बऱ्याच ठिकाणी कोसळत आहे. तर या शाळेत २२५ ते २५० विद्यार्थी शिक्षण घेत असून, निकृष्ट दर्ज्याच्या बांधकामामुळे सदर इमारत कमकुवत झाली आहे. तरी देखील शाळेचे सर्व वर्ग याच धोकादायक इमारतीत भरत असल्याचा आरोप भूमिपुत्र संघटनेने केला आहे. तर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला असून, दुर्दैवाने एखादी दुर्घटना घडल्यास यास जबाबदार कोण? असा गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे.

विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची इजा झाल्यास यास सर्वस्वी जबादार शिक्षण विभाग असणार आहे, असेही भूमिपुत्र शेतकरी संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. याकरिता विद्यार्थ्यांना बसण्यासाठी पर्यायी जागेची व्यवस्था त्वरित करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा व तात्काळ धोकादायक इमारत पाडून नवीन इमारत बांधण्यात यावी, अशी मागणी पिंपळास भूमिपुत्र संघटनेने केली असून, तसे न झाल्यास शिक्षण विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा भूमिपुत्र संघटनेने निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे.

logo
marathi.freepressjournal.in