खंडित वीजपुरवठ्यामुळे मूर्तिकारांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप

रायगड जिल्ह्यातील पेण-हमरापूर हे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींसाठी प्रसिद्ध आहे
खंडित वीजपुरवठ्यामुळे मूर्तिकारांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप

गणेशोत्सवाला अवघा आठवडा शिल्लक असतानाच चिरनेरमधील मूर्तिकारांची मूर्तीवर शेवटचा हात फिरवण्याची लगबग सुरू झाली आहे. सध्या येथील मूर्तिकारांना अजिबात फुरसत नसून दिवसरात्र यंत्रासारखे या मूर्तिकारांचे हात गणेशाच्या मूर्ती घडवत आहेत. त्यातच रोज तासनतास वीज खंडित होत असल्याने मात्र या मूर्तिकारांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे.

रायगड जिल्ह्यातील पेण-हमरापूर हे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींसाठी प्रसिद्ध आहे तसे उरण तालुक्यात शाडूच्या मातीपासून मूर्ती बनविण्यासाठी चिरनेर गाव प्रसिद्ध आहे. चिरनेरमधील प्रामुख्याने कुंभार समाजाची लोक हा परंपरागत गणेशमूर्ती बनविण्याचा व्यवसाय करतात. बहूतांश भूमिहीन असलेल्या या समाजातील ही लोक उन्हाळ्यात मातीची भांडी बनविण्याचा व्यवसाय करतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून येथील गणेशमूर्तींना मागणी वाढल्याने पूर्वी केवळ हौस आणि परंपरा म्हणून व्यवसाय करणाऱ्या या समाजाच्या लोकांनी या व्यवसायात चांगले बस्तान बसविले आहे. या गावातील नंदकुमार चिरनेरकर, गजानन चौलकर, या मूर्तिकारांच्या मूर्तींना तर मोठमोठ्या शहरातून मागणी असते. यातील काही मूर्तिकारांच्या मूर्ती परदेशीसुद्धा गेलेल्या आहेत.

पूर्वी १०० टक्के शाडूच्या मातीपासून इकोफ्रेंडली अशा पर्यावरणाला पूरक गणपतीच्या मूर्ती येथे बनविल्या जात असत. मात्र शाडूमातीच्या मूर्ती या अतिशय नाजूक, खर्चिक असल्याने आणि बाजारात पेणच्या स्वस्त आणि मजबूत मूर्तींना मागणी वाढल्याने चिरनेरमधील कलाकारांनीही कालानुरूप बदल करून पीओपीच्या मूर्ती बनविण्यास सुरुवात केली आहे. येथे पीओपीच्या मूर्ती जरी बनत असल्या तरी शाडूच्या गणेशमूर्तींना चांगली मागणी असते. शाडूच्या मातीपासून येथे जास्तीत जास्त साडेसात फूट उंचीची येथे मूर्ती बनविली जाते. चिरनेरमधील साधारण ३० ते ३५ गणपती बनविण्याचे कारखाने आहेत. यामध्ये सुमारे पाच हजार लहान-मोठ्या मूर्ती तयार केल्या जातात.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in